जागतिक स्पर्धेत मोठे आव्हान असते. परंतु त्यासाठी कसून सराव होतो. नेमके हेच यश मला खुणावते आहे. या स्पध्रेतील सवरेतम कामगिरी करण्याचे माझे ध्येय आहे, असे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पूजा सहस्रबुद्धे-कोपरकरने सांगितले.
पूजाने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला दुहेरी टेबल टेनिस स्पध्रेत नुकतेच विजेतेपद मिळवले. तिने या मोसमात वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत एकेरीचे रौप्यपदक मिळवले आहे. तसेच सूरत येथे झालेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. रिओ ऑलिम्पिकसाठी होणाऱ्या पात्रता स्पर्धेत खेळण्याची तिला संधी मिळाली आहे. या खेळात आतापर्यंत तिने केलेल्या वाटचालीबद्दल केलेली बातचीत-
* हा मोसम तुझ्यासाठी खूप यश मिळवून देणारा आहे, असे तुला वाटते काय?
होय, या मोसमात मी आजपर्यंत केलेल्या अथक परिश्रमाचे चांगले फळ मला मिळत आहे. राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवू शकले नाही तरी माझ्या खेळाबाबत मी समाधानी आहे. पहिल्या पाच स्पर्धकांमधील आम्ही खेळाडू आलटून पालटून सर्वोत्तम यश मिळवीत असतो. अंतिम फेरीच्या दिवशी ज्याची कामगिरी अधिक चांगली होईल, तोच विजय मिळवू शकतो. रौप्यपदकदेखील माझे मनोधैर्य उंचावणारे आहे. त्याचा फायदा भावी कारकीर्दीसाठी निश्चित होणार आहे.
* जागतिक स्पर्धेसाठी कशी तयारी करीत आहेस?
भारतीय संघासाठी अतिशय अनुभवी असलेले भवानी मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अनेक वर्षे भारतीय खेळाडूंबरोबर मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. भारतीय खेळाडूंच्या खेळातील सर्वच बारकाव्यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला फायदा होणार आहे. सामन्यांचा सराव, वेगवेगळी व्यूहरचना व सहकाऱ्यांमधील समन्वय यावर सराव शिबिरात भर दिला जात आहे.
* ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत किती आव्हान असणार आहे?
ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहात असतो. मीदेखील हे स्वप्न उराशी बाळगून आहे. आशियाई स्तरावरील ही पात्रता स्पर्धा असल्यामुळे टेबल टेनिसमधील सर्वच शक्तिमान देशांचे खेळाडू तेथे उतरणार आहेत. विशेषत: चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया आदी देशांमधील तुल्यबळ खेळाडूंशी मला खेळावे लागणार आहे. तिथे खडतर कसोटी असली तरी माझ्या क्षमतेइतकी शंभर टक्के कामगिरी करण्याचा माझा निर्धार आहे.
* सामन्यातील कोणत्या तंत्राबाबत तुझी हुकूमत आहे ?
बॅकहँड फटक्यांबाबत माझी हुकूमत आहे. तसेच रॅलीज व प्रतिहल्लासुद्धा मी चांगल्या रीतीने करू शकते. फोरहँड फटक्यांबाबत अधिक परिपक्वता आणण्याचे माझे ध्येय आहे. भारतीय सराव शिबीर असो किंवा एरवीचा नियमित सराव असो. आपला कमकुवतपणा दूर करण्यावरच माझा भर असतो.
* आजपर्यंतच्या वाटचालीचे श्रेय कोणाला देता येईल?
माझी आई व बहीण यांच्यामुळे मी या खेळात आले. माझी बहीण प्राजक्ता ही टेबल टेनिस खेळत असे. तिचा खेळ पाहता-पाहता मीदेखील हळूहळू हा खेळ खेळू लागले. माझ्या प्रशिक्षक शैलजा गोहाड यांनी माझ्या खेळातील नैपुण्य पाहून मला या खेळातच कारकीर्द घडवण्याचा सल्ला दिला. हा सल्ला योग्य मानून मी त्यांच्याकडेच हा खेळ शिकले व आमची गुरू-शिष्याची जोडी माझा विवाह होईपर्यंत सुरू राहिली होती. माझे पती अनिकेत कोपरकर हे आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे सतत त्यांचे सहकार्य मिळत आहे. माझा फक्त घरचा पत्ता बदलला आहे. अनिकेतचे आईवडील हे मला सतत खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. पुण्याचाच आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहित चौधरी याचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. करिअरच्या सुरुवातीला एअर इंडिया व त्यानंतर तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) यांचे मला सहकार्य मिळाले आहे. ओएनजीसीमध्ये मी नोकरी करीत असून मला सर्व सुविधा व सवलती मिळत आहेत.
* या खेळात करिअर करण्याच्या कितपत संधी आहेत?
गेल्या दहा वर्षांमध्ये या खेळातील पायाभूत सुविधा वाढल्या आहेत, त्यांचा दर्जाही जागतिक दर्जाचा आहे. पेट्रोलियम कंपन्या, विविध बँका, आयुर्विमा मंडळ तसेच अन्य काही शासकीय आस्थापनांमध्येही खेळाडूंना नोकरीची संधी मिळू लागली आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंनी या खेळात करिअर करण्याचा निश्चितपणे विचार करावा, असे मी आत्मविश्वासाने सांगू शकेन.

मिलिंद ढमढेरे