06 December 2019

News Flash

आशियाई कुस्ती स्पर्धा ही ऑलिम्पिकसाठी सर्वोत्तम पूर्वतयारी!

आठवडय़ाची मुलाखत : राहुल आवारे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू

|| धनंजय रिसोडकर

आठवडय़ाची मुलाखत : राहुल आवारे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू

आशियाई कुस्ती स्पर्धेत मी ६१ किलो वजनी गटात खेळणार असलो तरी ऑलिम्पिकसाठी माझा वजनी गट ५७ किलो हाच राहणार आहे. आवश्यकतेनुसार शैलीत बदल करण्याची क्षमता माझ्यात असून, स्वत:च्या मेहनतीवर मला विश्वास आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धा ऑलिम्पिकसाठी सर्वोत्तम पूर्वतयारी ठरणार असल्याचे राष्ट्रकुलमधील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू राहुल आवारेने सांगितले.

चीनमधील जियान येथे २४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकच मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे राहुलने सांगितले. या स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर भविष्यातील योजनांबाबत राहुलशी केलेली खास बातचीत –

  • यापूर्वी तू आशियाई स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक मिळवले आहेस. यंदाच्या स्पर्धेत काही विशेष लक्ष्य आहेत का?

मी यापूर्वी आशियाई कुस्ती स्पर्धेत २०११मध्ये रौप्य आणि २०१३मध्ये कांस्यपदक मिळवले होते. त्या दोन्ही पदकांनी मला नावलौकिक मिळवून दिला. त्यानंतरच्या काळात काही वेळा दुखापती तर काही अन्य कारणांनी मला पदक मिळवता आले नाही. मात्र आता मी एक अनुभवी मल्ल असून अद्यापही मिळवता न आलेले सुवर्णपदक हेच माझे लक्ष्य आहे. त्यामुळे आशियाईतील तिन्ही रंगांची पदके माझ्या नावावर जमा झाल्याचे समाधान मला मिळेल.

  • यंदाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी काही वेगळी तयारी किंवा विशेष प्रशिक्षण घेतले आहेस का?

नवनवीन डावपेच आणि त्या डावपेचांमध्ये अधिकाधिक कुशलता मिळवण्यावर भर देणे, हा नियमित तयारीचाच भाग असतो. यंदा संघटनेच्या माध्यमातून प्रख्यात इराणी प्रशिक्षक हसन रहमानी यांच्याकडून सोनीपतला महिनाभराचे विशेष प्रशिक्षण घेतले असून, त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. अनुभवी मल्लांना त्यांच्या तंत्राला थोडे अधिक पक्के कसे करता येऊ शकते, हे धडे हसन यांनी दिले आहेत. त्याचा फायदा माझ्यासह या स्पर्धेला जाणाऱ्या सर्व भारतीय मल्लांना होईल.

  • वजनी गटात बदल करण्याचा परिणाम ऑलिम्पिकच्या तयारीवर होणार नाही का?

आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे मला वजनी गटात बदल करणे क्रमप्राप्त होते. तसेच आशियाई कुस्ती स्पर्धा ही माझ्यासारख्या कमी वजनी गटातील कुस्तीपटूंसाठी ऑलिम्पिकइतकीच चुरशीची असते. कारण या वजनी गटांमधील बहुतांश पदकांवर आशियाई देशांचे वर्चस्व असते. त्यामुळे वजनी गट बदलण्याचा कोणताही परिणाम माझ्या ऑलिम्पिक तयारीवर होणार नाही. उलट झालाच तर थोडय़ा अधिक वजनी मल्लांशी झुंजताना वापराव्या लागणाऱ्या अतिरिक्त बळाचा फायदाच होईल, असे वाटते.

  • ऑलिम्पिक पात्रतेसाठी कोणत्या स्पर्धामध्ये खेळणार आहेस?

आशियाई स्पर्धेनंतर मी लगेच माझे वजन कमी करून ऑलिम्पिक पात्रतेच्या तयारीला लागणार आहे. सप्टेंबरपासून ऑलिम्पिकच्या पात्रता फेऱ्यांना प्रारंभ होणार आहे. कझाकस्तानला होणारी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच त्यानंतर इटली आणि तुर्कीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होऊन ऑलिम्पिक पात्रता गाठण्यावर भर देणार आहे. या स्पर्धामध्ये जगभरातील त्या त्या वजनी गटातील सर्व मातब्बर उतरणार असल्याने तिथपासून खऱ्या अर्थाने कस लागण्यास प्रारंभ होईल.

  • मल्लांना संघटनेकडून मिळणाऱ्या मानधनावर तसेच केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत समाधानी आहेस का?

संघटनेला आता मोठमोठे प्रायोजक लाभले असल्याने आमच्या मानधनातदेखील बऱ्यापैकी वाढ झाली आहे. तसेच वेगवेगळ्या कुस्ती लीगमधून मल्लांना काही प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळत आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीत समाधानकारक नसली तरी बरीच सुधारणा आहे. केंद्र शासनाकडूनदेखील सोयीसुविधा आणि अन्य सर्व प्रकारचे सहकार्य चांगले मिळत असल्याने कुस्तीला भारतात पुन्हा ऊर्जितावस्था येत आहे.

 

First Published on April 22, 2019 1:42 am

Web Title: loksatta sport interview with rahul aware 2
Just Now!
X