18 October 2019

News Flash

विश्वचषकात धावांचा वर्षांव होईल!

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे मत

|| प्रशांत केणी

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे मत

ट्वेन्टी-२० क्रिकेट रुजल्यापासून फलंदाजांची कल्पकता वाढली आहे. विविध फटक्यांची नजाकत, आक्रमकता आणि जोखीम अशा गोष्टी फलंदाजांमध्ये दिसू लागल्या आहेत. दोन नवे चेंडू आणि काही षटकांमध्ये क्षेत्ररक्षणाचे बंधन हे मुद्देसुद्धा गोलंदाजांच्या विरोधात जाणारे आहेत. त्यामुळे विश्वचषक क्रिकेट सामन्यांमध्ये सहज साडेतीनशे-चारशे धावा होऊ शकतात. अगदी पाचशे धावांपर्यंत मर्यादित न राहता त्याहूनही अधिक धावा होऊ शकतील, अशी आशा भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केली.

  • १९९२च्या विश्वचषकात तू राऊंड रॉबिन पद्धती अनुभवली आहेस. या विश्वचषकात तीच पद्धती किती आव्हानात्मक ठरू शकेल?

राऊंड रॉबिन पद्धतीचे स्वरूप संघांना उत्तम खेळायची संधी देते. गटसाखळी पद्धतीत जो संघ वाईट खेळेल, तो स्पध्रेबाहेर जाण्याच्या मार्गावर असतो. २००७च्या विश्वचषकाकडे सखोलपणे दोन अनपेक्षित संघ ‘सुपर एट’ स्तरापर्यंत पोहोचले होते. परंतु राऊंड रॉबिन पद्धतीत दीर्घकाळ सामने चालणार असल्यामुळे सावरण्यासाठी पुरेशी संधी आहे. शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक क्षमतेचा कस या पद्धतीत लागतो.

  • चौथ्या क्रमांकाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. कोणता फलंदाज या क्रमांकावर खेळावा असे तुला वाटते?

चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण, यासाठी चिंता बाळगायची गरज आहे, असे मला वाटत नाही. कारण भारतीय संघाची कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली होत आहे. जेव्हा ती खराब होते, तेव्हा या दृष्टीने गांभीर्याने विचार केला जातो.

  • भारताच्या गोलंदाजीच्या माऱ्याबाबत तुझे काय मत आहे?

२००३मध्ये भारताकडे आशीष नेहरा, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ हे वेगवान तसेच अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग हे फिरकी गोलंदाज होते. तो त्या काळातला सर्वात सशक्त गोलंदाजीचा मारा होता. त्यामुळे भारताला उत्तम कामगिरी साकारता आली. त्याचप्रमाणे आता भारताकडे जगातील सर्वोत्तम मारा आहे. भुवनेश्वर कुमार चेंडू उत्तम स्विंग करतो. मोहम्मद शमीकडे अचूकता आहे, तर जसप्रीत बुमरा सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. बाकी हार्दिक पंडय़ा आणि विजय शंकर गोलंदाजीत साहाय्यकाची भूमिका बजावतील. याशिवाय कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल हे मनगटी गोलंदाज आहेत. रवींद्र जडेजा अप्रतिम फिरकी गोलंदाजी करतो, केदार जाधवसारखा उत्तम कामचलाऊ फिरकी गोलंदाजसुद्धा आपल्याकडे आहे. कर्णधार विराट कोहलीकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

  • इंग्लंडमधील वातावरण किती महत्त्वाचे असेल?

वातावरण हा घटक इंग्लंडमध्ये अत्यंत महत्त्वाचा असेल. कारण सामना सुरू होताना निरभ्र आकाश असते, परंतु तासाभरात ते ढगाळलेले दिसते. त्यामुळे वातावरणाचा योग्य अंदाज घेऊन निर्णय घ्यावा लागेल.

  • ट्वेन्टी-२० क्रिकेट अस्तित्वात आल्यापासून एकदिवसीय क्रिकेटमधील धावसंख्येचा आलेख उंचावला आहे. इंग्लंडमध्ये विश्वचषकात मोठय़ा धावसंख्या रचल्या जातील, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. त्याविषयी काय सांगशील?

गेल्या काही दिवसांत इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांत साडेतीनशे धावा झाल्या आहेत, याचप्रमाणे ४५ षटकांत त्यांचा यशस्वी पाठलागसुद्धा झाला आहे. काही नियम गोलंदाजांच्या विरोधात जाणारे आहेत. ट्वेन्टी-२० क्रिकेटचा पुरेसा सराव फलंदाजांना मिळत आहे. काही वर्षांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्विंग हे हत्यार गोलंदाज वापरायचे. परंतु गेल्या सहा-सात वर्षांत तो पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे साडेतीनशे-चारशे धावा होत आहेत. अगदी पाचशेसुद्धा होऊ शकतील. तिथपर्यंत मर्यादित न राहता त्याहूनही अधिक धावा होऊ शकतील.

  • भारत-पाकिस्तान यांच्यात १६ जूनला होणाऱ्या सामन्याकडे तू कसे पाहतो आहेस?

विश्वचषकातील एका सामन्याप्रमाणेच पाहात आहे. जसे विश्वचषकातील एकेक सामने होत जातील, तसेच त्या एकेक प्रतिस्पर्धी संघांकडे पाहायचे असते. त्यानुसार रणनीती आखायची असते. हीच वाटचाल विश्वचषक विजेतेपदापर्यंत जाते, याची जाणीव खेळाडूंना असते.

  • न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात झालेल्या पराभवाकडे तू कशा रीतीने पाहतोस?

विश्वचषक स्पर्धा अजून सुरूही झालेली नाही. प्रत्येक संघ संघबांधणीचा समन्वय साधायचा प्रयत्न करीत आहे. वातावरणानुसार गोलंदाजसुद्धा सज्ज होत आहे. त्यामुळे मी सध्या तरी चिंतेत नाही.

  • यंदाच्या विश्वचषकाबाबत तुझा काय अंदाज आहे आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून काय अपेक्षा आहेत?

जो संघ योग्य समतोल साधेल, त्याला उपांत्य फेरी गाठता येईल. अफगाणिस्तानचा संघ आश्चर्यकारक कामगिरी करू शकेल. न्यूझीलंड संघाकडूनही विशेष अपेक्षा करायला हरकत नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीप्रमाणेच मजबूत आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ परतल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. उपांत्य फेरीतील चार संघांमध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश नक्की असू शकेल.

राऊंड रॉबिन पद्धतीचे स्वरूप संघांना उत्तम खेळायची संधी देते. गटसाखळी पद्धतीत जो संघ वाईट खेळेल, तो स्पध्रेबाहेर जाण्याच्या मार्गावर असतो. राऊंड रॉबिन पद्धतीत दीर्घकाळ सामने चालणार असल्यामुळे सावरण्यासाठी पुरेशी संधी आहे. शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक क्षमतेचा कस या पद्धतीत लागतो.

First Published on May 26, 2019 11:24 pm

Web Title: loksatta sport interview with sachin tendulkar