आठवडय़ाची मुलाखत : साक्षी मलिक, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू

खेळ असो वा अन्य कुठलेही क्षेत्र, त्यात पुढे जाण्याच्या मार्गात अडथळे येतीलच, पण त्यांना सामोरे जात अथक मेहनत घ्या, असा सल्ला रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिने उदयोन्मुख मुलींना दिला. खास लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

  • तू उदयोन्मुख मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहेस, त्यामुळे त्यांना खेळण्याबद्दल काय सांगशील? सरकारने त्यासाठी काय करायला हवे?

उदयोन्मुख मुलींना मी फक्त एवढेच सांगेन की, खेळ असो किंवा अन्य कुठलीही गोष्ट, तुम्ही त्यामध्ये स्वत:ला झोकून द्यायला हवे. पूर्ण मनापासून तुम्ही ते करायला हवे. या मार्गात समस्या आणि अडथळे नेहमीच येत राहतील, पण यशस्वी होण्यासाठी तुम्ही अथक मेहनत घ्यायला हवी. प्रतिष्ठा कमावूनच पुढे जायचे आहे. सरकारबाबत बोलायचे तर ते खेळासाठी बरेच काही करत आहे. यापुढेही त्यांनी त्यांचे काम अधिक जोमाने सुरू ठेवल्यास क्रीडा क्षेत्राकडे गांभीर्याने वळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होईल.

  • ऑलिम्पिकमध्ये जाण्यापूर्वी आणि आता पदक जिंकल्यावर स्वतबाबत तुला काय बदल जाणवतो?

पदक जिंकल्यावर माझे आयुष्य पूर्णपणे पालटले आहे. मला एवढे प्रेम आणि आदर मिळेल, असा कधी विचारही केला नव्हता. मी कुठेही गेले तरी सारेच जण माझ्याबरोबर छायाचित्र घेण्यासाठी, माझ्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आतुर झालेले असतात. जे लोक माझ्याशी साधे बोलायचेदेखील नाहीत, तेच लोक आज घरात येऊन मला फूले, भेटवस्तू आणि मिठाई देतात. हा मोठाच बदल माझ्या आयुष्यात घडला आहे!

  • ऑलिम्पिमधील अनुभवाबद्दल काय सांगशील?

ऑलिम्पकमधील अनुभव अविस्मरणीय होता. एवढय़ा साऱ्या मोठय़ा खेळाडूंबरोबर ऑलिम्पिकला जाणे आणि देशाचे प्रतिनिधित्व करणे ही मोठय़ा अभिमानाची गोष्ट आहे. मी रित्या हाताने मायदेशी परतले नाही, हा मोठा आनंद आहेच.

  • शेवटच्या दहा सेकंदांमध्ये तू लढत जिंकलीस. प्रशिक्षकांनी तुला काय सांगितले? प्रशिक्षकांचे तुझ्या कारकीर्दीमध्ये किती महत्त्व आहे?

खेळाडूच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठे स्थान प्रशिक्षकाचे असते. ते गुणवत्ता हेरतात आणि शिष्याला त्याची जाणीव करून देतात. जर आयुष्यात समर्पण नसेल तर तुम्हाला तुमचे ध्येय अशक्यप्राय वाटत असते. त्यामुळे खेळ आणि प्रशिक्षकाप्रीत्यर्थ समर्पण असायलाच हवे. कांस्यपदकाच्या लढतीत प्रशिक्षकांनी मला सांगितले की, तुला या लढतीत कोणत्याही परिस्थितीत हरायचे नाही. अखेरच्या सेकंदापर्यंत विजयासाठी प्रयत्न करायचा, संघर्ष करायचा. हिंमत हरायची नाही. त्यांचा हा सल्ला ऐकल्यावर माझे मनोबल उंचावले, आत्मविश्वास वाढला आणि मी विजय मिळवू शकले.

  • ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर आता मनावर किती दडपण जाणवते, आणि जबाबदारी वाढल्याचे वाटते?

दडपण असे काही वाटत नाही, पण अधिक चांगली कामगिरी करत राहायचे लक्ष्य असेलच डोळ्यांपुढे. आणखी पदके  जिंकून देशाचे नाव उंचवायचे आहे. जिंकायची जबाबदारी तर नेहमीच असते. आता आणखी जास्त मेहनत करायची आहे.

  • पदक जिंकल्यावर ‘बेटी खिलाओ’ असे तू म्हणाली होतीस. भारतामध्ये कुस्तीसारखा खेळ महिलांसाठी योग्य नाही असे समजले जाते का?

मी पदक जिंकेपर्यंत हा खेळ पुरुषांसाठीच असल्याचे बऱ्याच जणांना वाटत होते, पण आता हे चित्र बदलते आहे. हरियाणातील रोहतकमध्ये बहुतांशी मुलींना माझ्यासारखे कुस्तीपटू व्हायचे आहे. त्यांनी सराव करावा आणि या खेळाकडे अधिक गांभीर्याने बघावे.

  • ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी वयाच्या कुठल्या वर्षांपासून तयारी करायला हवी, असे तुला वाटते?

पदक जिंकण्याच्या तयारीसाठी असे कोणतेही नेमेके वय सांगता येऊ शकत नाही, कारण जे खेळाडू ऑलिम्पिकचे स्वप्न पाहतात त्यांना किती वेळ आणि किती मेहनत करायची हे माहिती असते. प्रत्येकाची पद्धत निराळी असते. स्वत:ची गुणवत्ता ओळखून खेळाडू सराव करत असतात.

मी पदक जिंकेपर्यंत हा खेळ पुरुषांसाठीच असल्याचे बऱ्याच जणांना वाटत होते, पण आता हे चित्र बदलते आहे. पदक जिंकल्यावर माझे आयुष्य पूर्णपणे पालटले आहे. मला एवढे प्रेम आणि आदर मिळेल, असा कधी विचारही केला नव्हता. सारेच जण माझ्याबरोबर छायाचित्र घेण्यासाठी, माझ्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आतुर झालेले असतात. जे लोक माझ्याशी साधे बोलायचेदेखील नाहीत, तेच लोक आज घरात येऊन मला फुले, भेटवस्तू आणि मिठाई देतात.