|| तुषार वैती, मुंबई

आठवडय़ाची मुलाखत : संदीप सिंग, भारताचा माजी हॉकीपटू

भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली असून आता या कामगिरीत सातत्य राखण्याची आवश्यकता आहे. भारताने यापुढेही सांघिक कामगिरी केल्यास यजमानांना अंतिम फेरीत पोहोचण्याची सुवर्णसंधी आहे, असे मत भारताचा माजी हॉकीपटू संदीप सिंग याने व्यक्त केले.

मायदेशातील विश्वचषकात भारताने दक्षिण आफ्रिका आणि कॅनडाचा धुव्वा उडवला तर बलाढय़ बेल्जियमला बरोबरी पत्करण्यास भाग पाडले. भारतीय खेळाडूंनी आक्रमक हॉकीचे प्रदर्शन करीत सात मैदानी गोल झळकावले. भारताने दोन विजय आणि एका बरोबरीसह क-गटातून थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. साखळीत भारताची कामगिरी दमदार झाली असली तरी यापुढे भारताला खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, हॉलंड आणि अर्जेंटिना यांसारखे बलाढय़ संघांशी भारताला सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच जोशाने कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे, असेही संदीपने सांगितले. भारताच्या एकूण वाटचालीविषयी संदीपशी केलेली ही बातचीत –

  • भारताच्या स्पर्धेतील एकूण कामगिरीविषयी काय सांगशील?

आतापर्यंत भारताची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. विश्वचषक आणि ऑलिम्पिकसारख्या स्पर्धा दर चार वर्षांतून एकदा येतात. त्यामुळे प्रत्येक संघ कित्येक महिने या स्पर्धेसाठी खडतर सराव करत असतो. भारताने पहिला टप्पा पार केला असला तरी आता यजमानांची खरी कसोटी लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामना हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला तर भारत नक्कीच अंतिम फेरी गाठू शकेल, असे मला वाटते.

  • भारताने दक्षिण आफ्रिका आणि कॅनडाचा धुव्वा उडवला, पण बलाढय़ बेल्जियमविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली, त्याविषयी काय सांगशील?

भारताला गटात आव्हान देणारा एकमेव संघ होता तो म्हणजे बेल्जियम. दक्षिण आफ्रिका आणि कॅनडाविरुद्ध आपण जिंकणारच होतो. भारताने बेल्जियमविरुद्धच्या सामन्यासाठीही उत्तम तयारी केली होती. त्यामुळेच सुरुवातीला गोल पत्करल्यानंतरही भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास ढळला नाही. उलट त्यांनी बेल्जियमला चोख उत्तर देत दोन गोलची भरपाई केली. अखेर बेल्जियमला बरोबरीसाठी संघर्ष करावा लागला. अखेरच्या क्षणी बचावपटूंकडून झालेल्या चुकांमुळे भारताला हा सामना बरोबरीत सोडवावा लागला.

  • भारतीय संघ पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात कमी पडत आहे का?

हरमनप्रीत सिंग हा भारताचा प्रमुख ड्रॅग-फ्लिकर आहे. या अनुभवी खेळाडूचा खेळ मी पाहिला आहे. त्याच्या फटक्यांमध्ये वेग आणि ताकद या दोन्ही गोष्टी आहेत. एखाद्या सामन्यात जर तो अपयशी ठरला तर वरुण कुमारची त्याला चांगली साथ लाभते. पण आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार केल्यास, भारताने चार गोल पेनल्टी कॉर्नरवर लगावले आहेत आणि एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर केला आहे. त्यामुळे पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारतीय संघ कोणत्याही प्रकारे कमी पडलेला नाही. गोलरक्षक प्रत्येक संघाच्या ड्रॅग-फ्लिकर्सचा अभ्यास करून या स्पर्धेसाठी येतात. त्यामुळे अमित रोहिदास हेसुद्धा भारतासाठी छुपे अस्त्र ठरणार आहे.

  • आता भारतासमोर कोणती आव्हाने आहेत?

उपांत्यपूर्व फेरीत भारताला नेदरलँड्स किंवा कॅनडा यापैकी एका संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पण दोन्ही संघांची हॉकी विश्वचषकातील कामगिरी समाधानकारक झालेली नाही. कॅनडा संघ विजयासाठी झगडत असून नेदरलँड्सला आतापर्यंत एकाच विजयाची नोंद करता आलेली आहे. त्या तुलनेत भारताची कामगिरी सरस झाली आहे. पण तरीही कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. नेदरलँड्स हासुद्धा तगडा संघ असून महत्त्वाच्या क्षणी कामगिरी कशी उंचवायची, याची त्यांना चांगली जाण आहे. भारताने आता श्रीजेश किंवा हरमनप्रीत, मनप्रीत सिंग यांच्यावर अवलंबून न राहता सांघिक खेळ करणे आवश्यक आहे.

  • प्रशिक्षक हरेंद्र सिंग आणि गोलरक्षक पी. आर. श्रीजेश यांच्याविषयी काय सांगशील?

हरेंद्र सिंग हे सध्याचे जगातील सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक मानले जातात. गेल्या १० वर्षांपासून त्यांनी स्वत:ला प्रशिक्षक म्हणून चांगले विकसित केले आहे. महिला आणि कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक असताना त्यांनी भारताला अनेक वेळा यश मिळवून दिले आहे. आता पुरुष संघाला आणि देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांची जेतेपदे मिळवून देण्यासाठी ते उत्सुक आहेत. गोलरक्षक श्रीजेशची स्तुती करावी तितकी कमी आहे. त्याने आतापर्यंत भारताच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. साखळी फेरीतही त्याने अनेक वेळा उत्तम बचाव केला आहे. विशेषत: बेल्जियमला थोपवून धरण्याची किमया त्याने केली होती. महत्त्वाच्या सामन्यांतही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.