16 October 2019

News Flash

टेबल टेनिसच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता!

आठवडय़ाची मुलाखत - ज्ञानशेखरन साथियान, भारतीय टेबल टेनिसपटू

|| ऋषिकेश बामणे

आठवडय़ाची मुलाखत – ज्ञानशेखरन साथियान, भारतीय टेबल टेनिसपटू

विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धेसाठी पात्र झाल्याचा आनंद आहेच, तरीही पुढील वर्षी टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे माझे मुख्य लक्ष्य आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू ज्ञानशेखरन साथियानने व्यक्त केली. त्याशिवाय टेबल टेनिसच्या पायाभूत सुविधांवर अजूनही मोठय़ा प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे त्याने सांगितले.

जागतिक टेबल टेनिस क्रमवारीत २८व्या स्थानी असणाऱ्या साथियानने जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई चषक स्पर्धेत सहावा क्रमांक मिळवत १८ ते २० ऑक्टोबरदरम्यान चीन येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची किमया साधली. क्रमवारीतील पहिल्या ३० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय टेबल टेनिसपटू ठरणाऱ्या २६ वर्षीय साथियनने वर्षअखेरीस अव्वल १५ खेळाडूंमध्ये धडक मारण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. आगामी आव्हाने व त्यासाठी आखलेल्या रणनीतीविषयी साथियानशी केलेली ही खास बातचीत-

  • कारकीर्दीत प्रथमच विश्वचषकासाठी पात्र ठरल्याबद्दल काय सांगशील?

माझ्या टेबल टेनिस कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असा तो क्षण होता. मुख्य म्हणजे लिन यूनविरुद्ध चुरशीच्या लढतीत पराभूत झाल्यामुळे माझी विश्वचषक खेळण्याची संधी पुन्हा हुकणार, अशी भीती निर्माण झाली होती. परंतु सहावा क्रमांक मिळवत मी पात्र ठरलो. विजेतेपद मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार, हेदेखील या स्पर्धेमुळे अधोरेखित झाले. त्याशिवाय आशियाई स्पर्धेत क्रमवारीत माझ्याहून वरच्या स्थानी असणाऱ्या खेळाडूंना मी पराभूत केले. त्यामुळे आत्मविश्वास उंचावला असून पुढील स्पर्धाच्या तयारीसाठी याचा अधिक लाभ होईल.

  • आगामी आव्हानांसाठी कशा रीतीने तयारी करत आहेस?

सध्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस रंगणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी मी कसोशीने सराव करत आहे. मात्र मुख्य लक्ष्य हे ऑलिम्पिक पात्रतेचेच आहे. २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी यंदाचे वर्ष फार महत्त्वाचे आहे. कोणत्याही खेळाडूचे ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हे स्वप्न असते. त्यामुळे ऑलिम्पिकपूर्वी होणाऱ्या विविध स्पर्धादरम्यानच्या काळातसुद्धा तंदुरुस्तीवर लक्ष पुरवण्याचे आव्हान असते. भारतीय क्रिकेट संघालादेखील आहार व तंदुरुस्तीविषयी मार्गदर्शन करणारे रामजी श्रीनिवास यांच्यामुळे माझ्या कामगिरीत सुधारणा झाल्या आहेत.

  • टेबल टेनिसच्या सुवर्णपिढीकडून ऑलिम्पिकमध्ये कशा प्रकारे अपेक्षा बाळगू शकतो?

माझ्याव्यतिरिक्त शरथ कमल, मनिका बत्रा, मधुरिका पाटकर हेदेखील विविध स्पर्धामध्ये छाप पाडत आहेत. गतवर्षीच्या राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धामध्ये मिळवलेले यश आम्हाला ऑलिम्पिकसाठी प्रेरणादायी आहे. आमच्या चौघांमध्येही पदक मिळवण्याची क्षमता असल्यानेच भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये किमान दोन पदके मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू, यात शंका नाही.

  • टेबल टेनिसच्या पायाभूत सुविधांविषयी तुझे काय मत आहे?

माझ्या मते पायाभूत सुविधांवर मोठय़ा प्रमाणात सुधारणेला वाव आहे. मुख्य म्हणजे शालेय स्तरांवर शिकवणाऱ्या प्रशिक्षकांना योग्य ते मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षभरापासून जवळपास प्रत्येक राज्यात शालेय पातळीवर टेबल टेनिसच्या स्पर्धाचे आयोजन होत आहे. त्याशिवाय खेलो इंडिया, अल्टिमेट लीग यांसारख्या स्पर्धामुळे युवा खेळाडूंनादेखील स्वत:ला सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळत आहे. भविष्याच्या दृष्टीने हे नक्कीच चांगले असले तरी अनेक ठिकाणी प्रशिक्षकांनाच खेळाच्या बारकाव्यांविषयी पुरेशी माहिती नसल्याने खेळाडूंना चुकीचे मार्गदर्शन केले जाते, असे मला वाटते. त्याशिवाय लहान वयातच खेळाडूंना तंत्रावर मेहनत करायला लावल्यास पुढे त्यांना अधिक सोयीस्कर ठरेल.

 

First Published on April 15, 2019 1:26 am

Web Title: loksatta sport interview with sathiyan gnanasekaran