27 November 2020

News Flash

ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे लक्ष्य!

आठवडय़ाची मुलाखत : शहझार रिझवी, आंतरराष्ट्रीय नेमबाज

|| धनंजय रिसोडकर, मुंबई

आठवडय़ाची मुलाखत : शहझार रिझवी, आंतरराष्ट्रीय नेमबाज

मार्च महिन्यात मेक्सिकोत झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक मिळवल्यानंतरच मी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याचे ध्येय ठेवले होते. त्यानंतर गुरुवारीच दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये मिळालेले रौप्यपदक आणि या वर्षभरातील कामगिरीमुळे मला जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थान गाठता आले. अशीच कामगिरी कायम ठेवत आता २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य आहे, असे नेमबाज शहझार रिझवीने सांगितले. दक्षिण कोरियातील जागतिक नेमबाजी स्पध्रेत रौप्यपदक मिळवून मायदेशी आलेल्या रिझवीशी केलेली खास बातचीत-

  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मिळालेल्या रौप्यपदकावर समाधानी आहेस का?

खरे सांगायचे तर अजिबात नाही. या स्पर्धेत सुवर्णपदकाचे ध्येय ठेवले होते. मात्र शेवटचा नेम साधताना १० गुण मिळाले. तिथे जर मला १०.४ गुण मिळाले असते तर सुवर्णपदक मिळाले असते.

  • राष्ट्रकुलमध्ये अनेक पदके मिळालेल्या भारतीय नेमबाजांपैकी या स्पर्धेत फक्त तुलाच पदकाची किमया कशी साधली?

राष्ट्रकुलमध्ये सहभागी देशांची संख्या तुलनेत कमी असल्याने ती स्पर्धा फारशी अवघड नव्हती. त्यामुळे भारताला नेमबाजीत अनेक पदके मिळाली. मात्र या स्पर्धेत जगातील सर्व अव्वल नेमबाज सहभागी झाले असल्याने त्यात पदक मिळवणे अवघड असते. त्यात मी देशासाठी एक रौप्यपदक मिळवू शकल्याचा आनंद आहे.

  • आर्थिक परिस्थिती बेताची असताना आणि मीरतसारख्या निमशहरी भागात राहून नेमबाजी हा खर्चीक खेळ तू कसा निवडला?

मला बालपणापासूनच बंदुकीचे आकर्षण होते. वयाच्या १२व्या वर्षीच मी वडिलांकडे नेमबाजी शिकण्याचा हट्ट धरला होता; परंतु खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या वडिलांचे उत्पन्न फारसे नसल्याने त्यांनी नकार दिला, तरीही मी एका स्थानिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन इतरांच्या बंदुकींसह सराव करायचो. अखेरीस २०१२ साली वडिलांनी पैसे गोळा करून मला स्वत:ची बंदूक घेऊन दिल्यानंतर माझा नेमबाज म्हणून खरा प्रवास सुरू झाला.

  • अवघ्या सहा वर्षांत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात छाप पाडू शकलास, याचे श्रेय कुणाला देशील?

मी एकदा ध्येय निश्चित केले, की केवळ त्याचाच ध्यास घेऊन त्याचा पाठलाग करतो. त्यामुळे मला वडिलांनी जेव्हा बंदूक घेऊन दिली, त्याच वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव झळकावण्याचे लक्ष्य मी ठेवले होते. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत केवळ नेमबाजी आणि त्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीवर भर देण्यावरच माझे लक्ष केंद्रित केले होते. या प्रवासात हवाई दलात मिळालेल्या नोकरीचा खूपच फायदा झाला. हवाई दलाकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. तसेच ग्रुप कॅप्टन दीपक अहलुवालिया, रौनक पंडित यांच्यासारखे मार्गदर्शक लाभल्यानेच हे यश शक्य झाले.

  • पदके मिळवण्याचा आणि जागतिक क्रमवारीतील स्थानात भरारी घेण्याचा वैयक्तिक कारकीर्दीत फायदा होतो का?

हवाई दलात मी सध्या सरजट पदावर कार्यरत असून माझ्या कामगिरीच्या आधारे लवकरच मला ज्युनिअर वॉरंट ऑफिसर म्हणून बढती मिळणार आहे. तसेच हवाई दलातील सर्व वरिष्ठांकडून मला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्यासाठी सतत प्रेरणा दिली जात असल्याचाही निश्चितच फायदा होतो.

  • टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत किती पदके मिळतील, असा तुझा अंदाज आहे?

सद्य:स्थितीत नेमबाजीतील भारतीयांची कामगिरी पाहता किमान दोन ते तीन पदके तरी मिळतील, असा विश्वास वाटतो. सगळे काही जुळून आले तर आपल्या नेमबाजांना तीनपेक्षा अधिक पदकेदेखील मिळू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 1:57 am

Web Title: loksatta sport interview with shehzar rizvi
Next Stories
1 सुमित, निखट, हिमांशू यांना सुवर्ण
2 दिल्लीच्या मार्गात बलाढय़ चेन्नईचा अडथळा
3 देना बँक, महाराष्ट्र पोलीस संघ उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X