|| ऋषिकेश बामणे

आठवडय़ाची मुलाखत : सुधा सिंग, भारतीय धावपटू

राष्ट्रीय तसेच वैयक्तिक विक्रम नोंदवल्यामुळे मी आनंदित आहे, मात्र माझे विजेतेपद देशभरातील छोटय़ा खेडय़ांतील मुलींना धावपटू म्हणून कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहित करू शकेल, असा आशावाद भारताची अव्वल धावपटू सुधा सिंगने व्यक्त केला.

रविवारी रंगलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये महिलांमध्ये सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घालणारी सुधा ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान दोहा येथे जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी थेट पात्र ठरली आहे. स्पर्धेची तयारी व भविष्यातील आव्हानांविषयी सुधाशी केलेली ही खास बातचीत-

  • सलग दुसऱ्यांदा पूर्ण मॅरेथॉनचे विजेतेपद मिळवलेस, या यशाबद्दल काय सांगशील?

मी २ तास ३७ मिनिटांत अंतर गाठण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते, मात्र २ तास ३४ मिनिटांत अंतर पूर्ण केल्यामुळे मी निश्चितच आनंदित आहे. खरे सांगायचे तर मी धावताना कधीच हातात घडय़ाळ घालत नाही. त्यामुळे वेळेकडे लक्षच राहत नाही. मात्र ‘पेसर’ने मी वैयक्तिक आणि राष्ट्रीय विक्रम केल्याचे सांगितले. त्या वेळी विश्वासच बसला नाही. मुंबई मॅरेथॉनमध्ये जर मी इतक्या वेळात हे अंतर पूर्ण करू शकते, तर यापुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मी २ तास ३० मिनिटांत नक्कीच शर्यत पूर्ण करेन.

  • या शर्यतीसाठी कशा प्रकारे तयारी केली?

प्रशिक्षक सुरेंदर सिंग यांचे माझ्या यशामागे फार मोठे योगदान आहे. मागील दोन महिने बेंगळूरु येथे त्यांनी माझ्यावर अथक मेहनत घेतली. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर मी जवळपास एक-दोन महिने विश्रांती घेतली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात माझे सराव शिबीर सुरू झाले. रोज चार ते पाच तास धावणे, व्यायाम व संतुलित आहार यांचे सुरेंदर यांनी सुरेख नियोजन केले. मुंबई मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळवण्याच्या निर्धारानेच मी उतरते. मेरठ येथे आजच खुली राष्ट्रीय क्रॉस-कंट्री स्पर्धा चालू आहे, मात्र मला मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे अधिक महत्त्वाचे वाटले.

  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळाली, आता पुढील लक्ष्य काय?

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी मी काही खास तयारी करणार नाही. किंबहुना, कोणत्याही धावपटूने एखाद्या स्पर्धेचे अतिरिक्त दडपण घेऊन त्याकरता विशेष तयारी करावी, हे मला पटत नाही. धावपटू म्हणून तुम्ही जो काही दैनंदिन सराव करता, तोच वर्षभर कायम ठेवला, तर तुम्हाला निकाल नक्कीच सकारात्मक मिळेल. आता मी पुढील एक वर्ष घरीच जाणार नाही. यासाठीच मी आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात २४ फेब्रुवारी रोजी दिल्ली मॅरेथॉन आहे. त्यासाठीसुद्धा मी आतापासूनच तयारीला लागणार आहे. स्टीपलचेस प्रकारात माझा कोणत्याही खेळाडूशी वैयक्तिक सामना नसून स्वत:ची कामगिरी सुधारण्यावरच मी भर देणार आहे.

  • देशातील महिला धावपटूंविषयी तुझे काय मत आहे?

पी. टी. उषा, ललिता बाबर, कविता राऊत यांसारख्या मातब्बर धावपटू भारतात घडल्या आहेत, मात्र कामगिरी करूनही महिलांना हवा तितका प्रकाशझोत मिळत नाही, असे मला वाटते. मला स्वत:ला अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर मध्य रेल्वेत नोकरी लागली. मात्र त्यापूर्वी २०१०मध्ये आशियाई स्पर्धेत पदक मिळवूनदेखील मला कोणीच फारसे ओळखत नव्हते. मात्र गेल्या काही वर्षांतील विजेतेपदामुळे आता विविध शहरांतील लहान मुलीदेखील माझ्यासह छायाचित्र काढण्यासाठी पुढे येतात, तेव्हा फार आनंद होतो. त्यामुळे माझे हे विजेतेपद देशभरांतील मुलींना धावपटू बनण्यासाठी प्रेरित करेल, अशी अपेक्षा आहे.