|| धनंजय रिसोडकर

आठवडय़ाची मुलाखत : सुमा शिरूर, माजी नेमबाज आणि प्रशिक्षक

पिस्तूल आणि रायफल या दोन्ही गटांत भारताकडे अव्वल नेमबाजांची भक्कम फळी निर्माण होत आहे. त्यामुळे २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेमध्ये भारताला दोन्ही प्रकारांत किमान सहा ते सात पदके मिळतील, असा विश्वास भारताची माजी नेमबाज आणि विद्यमान प्रशिक्षक सुमा शिरूर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये पदके जिंकणाऱ्या सुमा गेली काही वष्रे प्रशिक्षणाचे कार्य करीत आहे. त्यांनी २००८पासून पनवेलनजीक कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीमध्ये सुरू केलेल्या लक्ष्य अकादमीत सध्या ५०हून अधिक नेमबाज प्रशिक्षण घेत आहेत. नेमबाजीत सध्या भारताची चौफेर प्रगती होत असताना युवा नेमबाजांची कामगिरी आणि भविष्यात नेमबाजीची वाटचाल कशी राहील, याबाबत सुमा यांच्याशी केलेली खास बातचीत-

  • १२ ते १६ वयोगटातील मुले-मुली वरिष्ठ गटातही दैदीप्यमान कामगिरी करीत आहेत, याकडे तुम्ही कसे पाहता?

युवावस्थेकडे जाणाऱ्या मुलांचे गुणांचे प्रमाण बघून अक्षरश: चकित व्हायला होते. ही पिढी खूपच जिगरबाजपणे हे सर्व करीत असते. विशेषत्वे अपूर्णाकात गुण देण्याची पद्धत सुरू झाल्यापासून तर आपल्या प्रतिस्पध्र्यापेक्षा आपण एका गुणाने तरी पुढे असायचे, हेच त्यांचे लक्ष्य असते. त्यामुळे या खेळातील चुरस अधिक वाढली असून जगभरातील नेमबाजांच्या गुणांच्या सरासरीतही खूपच वाढ झाली आहे.

  • उदयोन्मुख खेळाडूंच्या वाढत्या उंची आणि ताकदीचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो का?

ताकदीतील परिणाम फारसा घडत नसला तरी वाढत्या उंचीचा खूप मोठा परिणाम त्यांच्या खेळावर होतो. बऱ्याचदा १२-१३ वर्षांचा मुलगा-मुलगी प्रचंड यशस्वी होत असते. मात्र दोन वर्षांनी त्यांच्या कामगिरीचा आलेख अचानक घसरायला लागतो. त्यामागे केवळ एकाग्रता घटणे किंवा अन्य कोणत्याही कारणापेक्षा त्यांची वाढणारी शारीरिक उंची कारणीभूत ठरत असते. त्यामुळे अशा नेमबाजांना पुन्हा एकदा स्वत:च्या उंचीनुसार बंदुकीच्या पकडीत बदल करावे लागतात. परंतु सातत्यपूर्ण सरावाने ते बदल करून पुन्हा त्यांना पूर्वीसारखे यश मिळवता येऊ शकते.

  • पौगंडावस्था आणि युवा वयोगटातील या नेमबाजांना यश-अपयशाचा सामना करणे कितपत कठीण जाते?

एकापाठोपाठ एक सरस नेमबाज भारतात उदयाला येत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. त्यांनी युवावस्थेतच मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. मात्र नेमबाजीच्या खेळात यश-अपयशाच्या प्रमाणात प्रचंड दोलायमानता असते. आधीच्या सत्रात विश्वविक्रम आणि नंतरच्या सत्रात पहिल्या पाचमध्येही नाही, असे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे यश आणि अपयशाच्या लोलकाचा सामना करण्याचे प्रशिक्षण घेणे, हे नेमबाजीइतकेच अवघड आहे, असे मला वाटते. त्यासाठी या वयातील नेमबाजांना सातत्याने विशेष मार्गदर्शन करावे लागते.

  • भारतीय नेमबाजीला येत्या दशकभरात कितपत प्रगती साधता येईल, असे तुम्हाला वाटते?

भारतीय नेमबाजीला सध्या सोन्याचे दिवस आले आहेत, असे म्हणता येईल. मनू भाकर, सौरभ चौधरी यांसारखे युवा नेमबाज भारताचे उज्ज्वल भवितव्य आहेत. पण त्याशिवाय महाराष्ट्राच्या शाहू मानेसह अनेक नेमबाज हे भारताला भविष्यात ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याची क्षमता बाळगून आहेत. त्यामुळे आगामी ऑलिम्पिकमध्ये भारत सहा ते सात पदके तर त्यानंतरच्या ऑलिम्पिकमध्ये पदकांचा दुहेरी आकडा गाठण्याची क्षमतादेखील गाठू शकतो, असा विश्वास वाटतो.