25 November 2017

News Flash

गुरूमुळेच कोणत्याही गोष्टीचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळते!

आठवडय़ाची मुलाखत : सुरेंदर नाडा, हरयाणा स्टीलर्स संघाचा खेळाडू

प्रशांत केणी, मुंबई | Updated: July 17, 2017 2:11 AM

सुरेंदर नाडा, हरयाणा स्टीलर्स संघाचा खेळाडू

आठवडय़ाची मुलाखत : सुरेंदर नाडा, हरयाणा स्टीलर्स संघाचा खेळाडू

गुरूमुळेच कोणत्याही गोष्टीचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळते.  आर. एस. खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी कबड्डीचे धडे गिरवले. त्यांनीच माझ्यात उत्तम कबड्डीपटूचे कौशल्य विकसित केले. आताही हरयाणा संघात ते सोबत आहेत, याचा मोठा आधार आहे, असे प्रो कबड्डी लीगमधील नवख्या हरयाणा स्टीलर्स संघाचा डावा कोपरारक्षक सुरेंदर नाडाने सांगितले.

मागील वर्षी अहमदाबादला झालेल्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुरेंदरने सुरुवातीच्या काही हंगामांमध्ये यू मुंबाचे प्रतिनिधित्व केले होते. चौडा पकडणे हे त्याच्या क्षेत्ररक्षणाचे हुकमी अस्त्र. ‘‘कोणत्याही खेळाकडे पाहिल्यास काही वैशिष्टय़े असतात, जी खेळाडू विशेषत्वाने जपतात आणि त्यांना त्यासाठीच ओळखले जाते. मला हे कौशल्य चांगले जमते. खोकर यांचे मार्गदर्शनसुद्धा त्यासाठी महत्त्वाचे ठरले. सरावाप्रसंगीही एक-दोन चढाईपटूंना घेऊन मी याबाबत कसून मेहनत घेतो,’’ असे सुरेंदरने सांगितले. प्रो कबड्डीच्या आगामी हंगामाबाबत सुरेंदरशी केलेली खास बातचीत.

  • मोहित चिल्लरसोबतची तुझी जोडी यू मुंबाकडून खेळताना गाजली होती. आता हरयाणाकडून खेळताना ही जोडी पुन्हा जुळणार आहे, याविषयी काय सांगशील?

मोहित दिल्लीचा आणि मी हरयाणाचा. परंतु आमच्या घरांमधील अंतर हे जवळपास ४० किलोमीटरचे असेल. आमच्यात जिवापाड मैत्री असल्यामुळे एकमेकांच्या घरी नेहमीच येणे-जाणे असते. प्रो कबड्डीच्या व्यासपीठावर आधी यू मुंबाकडून आणि आता हरयाणाकडून आम्ही बचावातील महत्त्वाच्या अशा दोन्ही कोपरारक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहोत.

  • प्रो कबड्डीच्या व्यासपीठावर तुझ्या ‘टॅटूज’चीही चर्चा होते, याबाबत काय सांगशील?

‘टॅटूज’ मला अतिशय आवडतात. मागील हंगामाच्या वेळीही प्रो कबड्डीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर असे दोन ‘टॅटूज’ गोंदवून घेतले होते. मला कबड्डी हा खेळ अतिशय आवडतो आणि तेच या ‘टॅटूज’मध्ये चित्रित होते. यंदाच्या हंगामाला प्रारंभ होण्यापूर्वी आणखी एखाद-दुसरा ‘टॅटूज’ गोंदवण्यासाठी मी उत्सुक आहे. ते नेमके काय असावे, याबाबत अद्याप विचार केलेला नाही.

  • उत्तम डावा कोपरारक्षक मिळणे, कबड्डीक्षेत्रात आव्हानात्मक असते. बचावफळीतील हे मोक्याचे स्थान आपण सांभाळावे, ही जाणीव तुला कधीपासून झाली?

सुरुवातीला कबड्डी खेळताना असे काही ठरवले नव्हते. मात्र उत्साहाने खेळायचो. भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये प्रशिक्षण घेत असताना डाव्या कोपरारक्षण गांभीर्याने करू लागलो.

  • केंद्रीय औद्योगिक पोलीस दलात (सीआयएसएफ) तू मुख्य शिपाई पदावर कार्यरत आहेस. प्रो कबड्डीमुळे तू चर्चेत आल्यानंतर तुझ्याकडे कशा रीतीने पाहिले जाते?

सीआयएसएफमध्ये मी कबड्डीपटू म्हणूनच नोकरीला असल्यामुळे दैनंदिन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करणे क्रमप्राप्त असते. प्रो कबड्डीमुळे माझे संपूर्ण आयुष्यच जणू बदलून गेले आहे. निवास आणि नोकरीच्या ठिकाणी मला सन्मान दिला जातो.

  • कबड्डी खेळाकडे कसा वळलास?

मी ज्या परिसरात राहतो, तिथे कबड्डी आणि कुस्ती हेच खेळ जास्त लोकप्रिय आहेत. मला कबड्डी अधिक आवडायला लागली. मग खोकर यांच्या मार्गदर्शनाखालीच मी खेळाचे धडे गिरवले.

First Published on July 17, 2017 2:08 am

Web Title: loksatta sport interview with surender nada