|| ऋषिकेश बामणे

आठवडय़ाची मुलाखत : वर्षां नागरे, महिला सामनाधिकारी

महिला क्रिकेटला पूर्वीपेक्षा आता अधिक चांगले दिवस आले आहेत, मात्र क्रिकेटपटूव्यतिरिक्त इतर बाबींमध्ये अद्यापही परिस्थिती तशीच आहे. माझ्या कारकीर्दीद्वारे देशातील असंख्य मुलींना क्रिकेट सामनाधिकारी म्हणून कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरित करण्याचे लक्ष्य असून महिला क्रिकेटलाही पुरुषांप्रमाणेच उच्च दर्जा मिळवून द्यायचा आहे, असा विश्वास मुंबईच्या वर्षां नागरेने व्यक्त केला.

२०१२ पर्यंत मुंबईसाठी क्रिकेट खेळणारी वर्षां नुकतीच सामनाधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाली. आरती वैद्य, अंजली पेंढारकर यांच्यानंतर सामनाधिकारी परीक्षा उत्तीर्ण झालेली मुंबईतील ती तिसरी महिला ठरली. वर्षांशी तिच्या कारकीर्दीबाबत केलेली ही खास बातचीत –

  • पहिल्या लढतीत सामनाधिकारीची भूमिका बजावताना कोणती आव्हाने होती, त्या अनुभवाविषयी काय सांगशील?

१२ ऑक्टोबर रोजी बडोदा वि. छत्तीसगड यांच्यातील १९ वर्षांखालील महिलांच्या ट्वेन्टी-२० सामन्यात मी पहिल्यांदाच सामनाधिकारीची भूमिका बजावली. माझ्याकडून एखादा चुकीचा निर्णय दिला गेला किंवा दडपणाच्या परिस्थितीत योग्य तो निर्णय वेळेत घेण्यास आपण कमी पडलो, तर काय होईल? यांसारख्या असंख्य विचारांनी डोके भांबावून गेले होते. मात्र गणेश अय्यर सरांशी संवाद साधल्याने माझ्यावरील ताण मोठय़ा प्रमाणात कमी झाला. त्याशिवाय तिसऱ्या पंचाची भूमिकासुद्धा मीच सांभाळत असल्याने पहिला निर्णय घेण्याची वेळ जेव्हा आली, त्या वेळी अक्षरश: माझ्या पोटात गोळा आला होता. सुदैवाने मी योग्य तो निर्णय मैदानावरील पंचांना कळवला व मी सुटकेचा श्वास सोडला.

  • सामनाधिकारी म्हणून कारकीर्द घडवण्याचा विचार कधी पक्का केला?

खरे तर मी आयुष्यात कधीही सामनाधिकारी व्हायचे ठरवले नव्हते. २०१० ते २०१८ या कालखंडात मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) गुणलेखक म्हणून काम केले. त्या वेळी मला फक्त पंच बनण्याची इच्छा होती. मात्र यंदा जुलै महिन्यात अचानकपणे सामनाधिकाऱ्यांसाठी निवडप्रक्रिया सुरू झाली व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व नियम व अटींमध्ये मी चपखलपणे बसू शकत असल्यामुळे नाव नोंदवले.

  • सामनाधिकारी म्हणून सुरुवात झाली, आता पुढील ध्येय काय?

सध्या मी फक्त प्रथम श्रेणी आणि राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धामध्ये सामनाधिकारीचे काम करत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येसुद्धा मला सामनाधिकारी म्हणून कार्यरत राहायचे आहे. मुख्य म्हणजे महिला क्रिकेटला आता प्रसिद्धी मिळत असली तरी त्यांना हवा तितका दर्जा सगळीकडे दिला जात नाही. सामनाधिकारी या नात्याने महिला क्रिकेटलादेखील जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी मी नेहमीच झटत राहीन.

  • अथक परिश्रमानंतर मिळालेल्या यशाचे श्रेय कोणाला देशील?

अनेकांनी वेळेनुसार मला मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले, मात्र माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ यांचा माझ्या वाटचालीत मोलाचा वाटा आहे. मैदानावरील पंच, तिसरा पंच व सामनाधिकारी यांच्या कार्याबाबत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. बेंगळूरु येथील निवडप्रक्रियेपूर्वी त्यांनाच आमच्या सराव शिबिराचे मुख्य कार्यकारी म्हणून नेमण्यात आले होते. सामनाधिकारी हे फक्त माजी खेळाडूच बनू शकतात, हेसुद्धा मला श्रीनाथ यांच्याकडूनच कळले. सामन्यापूर्वी करायची तयारी, ‘बीसीसीआय’तर्फे लागू करण्यात आलेल्या सर्व आचारसंहितांचे रोजच्या रोज स्मरण या प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टींची आम्हा सर्वाना सवय व्हावी, यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. त्याबरोबरच आई-वडिलांचे योगदानही महत्त्वाचे आहे.