News Flash

महाराष्ट्राच्या मल्लांनी संकुचित वृत्ती सोडावी

आठवडय़ाची मुलाखत : विलास कथुरे, आंतरराष्ट्रीय पंच

आठवडय़ाची मुलाखत : विलास कथुरे, आंतरराष्ट्रीय पंच

महाराष्ट्रीयन मल्लांनी केवळ महाराष्ट्र केसरी या किताबापुरते ध्येय न ठेवता त्यापलीकडे जाऊन जागतिक स्तरावर कशी चमक दाखविता येईल याचा विचार केला पाहिजे. सुदैवाने हल्लीच्या मल्लांना शासनाकडून व अन्य स्रोतांद्वारे भरपूर आर्थिक साहाय्य मिळत असते. त्याचा लाभ घेत ऑलिम्पिक पदकाचा ध्यास ठेवला पाहिजे, असे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व प्रशिक्षक विलास कथुरे यांनी सांगितले.

कथुरे यांनी खेळाडू, प्रशिक्षक, पंच व संघटक अशा विविध भूमिकांद्वारे जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. भारतीय संघासाठी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच आशियाई, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठी तांत्रिक अधिकारी म्हणूनही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे ते सध्या सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. २० डिसेंबरपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्राच्या मल्लांविषयी संवाद साधला.

  • महाराष्ट्र केसरी स्पर्धेद्वारे राज्यात कितपत नैपुण्य तयार होते?

या स्पर्धेद्वारे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही भरपूर नैपुण्य तयार होत असते. कुस्ती हा ग्रामीण भागातील लोकांच्या नसानसात भिनलेला खेळ आहे. त्यामुळे गावच्या मल्लाविषयी चाहत्यांमध्ये खूप आदर असतो. त्याला सहकार्य करायला अनेक लोक तयार असतात. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने केसरी किताबाच्या लढतींखेरीज अन्य कोणत्याही स्पर्धामध्ये केसरी किताब वापरण्यावर बंदी घातली आहे. याचा अर्थ राज्यातील अन्य स्पर्धा कमी झालेल्या नाहीत. उलट स्पर्धाची संख्या वाढत आहे. त्यामुळे कुस्ती नैपुण्याची प्रगती होत आहे.

  • राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले मल्ल फारशी चमक दाखवू शकत नाहीत त्यामागे कोणते कारण असावे?

आमच्या वेळी हल्लीच्या काळाइतक्या सुविधा व सवलती मिळत नव्हत्या. आता मल्लांना भरपूर सुविधा व सवलती मिळत आहेत. सेनादल, रेल्वे, पोलीस दल आदी विविध शासकीय संस्थांमध्ये मल्लांकरिता राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अर्थार्जनाची हमी असल्यामुळे राज्यातील मल्लांनी संकुचित वृत्ती न धरता महाराष्ट्राचे नाव कसे उंचावता येईल याचा विचार केला पाहिजे. केंद्र शासनाने संभाव्य ऑलिम्पिकपटूंकरिता आर्थिक साहाय्याची योजना सुरू केली आहे. परदेशी प्रशिक्षक, परदेशातील स्पर्धात्मक सराव यासाठी अशा निधीचा उपयोग करता येणार आहे. आपली संभाव्य ऑलिम्पिकपटूंमध्ये कशी निवड होईल या दृष्टीने सर्वोच्च यश मिळविले पाहिजे.

  • खेळाडूंचा दर्जा सुधारण्याविषयी सरावात काय बदल अपेक्षित आहे?

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी हरयाणा, पंजाब, दिल्लीच्या मल्लांबरोबर सराव केला पाहिजे. त्याचप्रमाणे पुण्यातही आर्मी स्पोर्ट्स सेंटरमध्ये खूप चांगले खेळाडू आहेत. त्यांच्याबरोबर नियमित सराव लढती आयोजित करणे सहज शक्य आहे. त्यांनाही अन्य खेळाडूंबरोबर सराव करायला आवडत असते. राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी राज्य संघात निवड झालेल्या खेळाडूंकरिता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याची आवश्यकता आहे.

  • महाराष्ट्रात प्रशिक्षकांची कमतरता आहे का?

निश्चितच. खेळाडूंची संख्या वाढली आहे. त्या प्रमाणात प्रशिक्षक उपलब्ध होत नाहीत. प्रशिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांनी अल्प मुदतीचा अभ्यासक्रम न करता पतियाळा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा एक वर्षांचा अभ्यासक्रम केला पाहिजे. त्यामुळे त्यांना विविध प्रकारे खेळाडूंना कसे प्रशिक्षण देता येईल याचे सखोल ज्ञान मिळू शकेल. परदेशातही बदलत्या तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षकांकरिता उद्बोधक शिबिरे आयोजित केली जात असतात. त्यामध्येही आपल्या प्रशिक्षकांनी भाग घेतला पाहिजे.

  • उत्तेजकाबाबत काय सांगता येईल?

उत्तेजकामुळे खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीवर विपरीत परिणाम होतो. किंबहुना, त्याचे जीवन उद्ध्वस्तही होऊ शकते हे लक्षात घेऊनच शालेय स्तरापासून खेळाडूंना उत्तेजकापासून कसे दूर राहता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले पाहिजे. त्याचप्रमाणे कोणते पदार्थ घ्यावेत व कोणते घेऊ नयेत याबाबतही खेळाडूंना सुरुवातीपासून शिकविले पाहिजे. महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी मिळविलेल्या ऑलिम्पिक कांस्यपदकापासून प्रेरणा घेत नवोदित खेळाडूंनी ती परंपरा पुन्हा निर्माण करण्यासाठी कसून सराव केला पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 2:27 am

Web Title: loksatta sport interview with vilas kathure
Next Stories
1 उपल थरंगाची विकेट काढणारा धोनी टीम इंडियासाठी पुन्हा ठरला लकी!
2 Ind vs Sl 3rd ODI: श्रीलंकेविरुद्ध भारताचा दणदणीत विजय, मालिकाही खिशात
3 Dubai BWF World Super Series Final: रोमहर्षक सामन्यात सिंधूचा निसटता पराभव
Just Now!
X