महान क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांना विश्वास; विराटच्या खेळाकडे पाहण्याच्या आक्रमक दृष्टिकोनाची मोहिनी

‘‘काही देश आजही कसोटी क्रिकेटकडे गांभीर्याने पाहतात, ही खेळातील सर्वात अभिमानाची गोष्ट आहे. नुकतीच झालेली भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिका पाहिल्यास कसोटी क्रिकेटमधील रंजकता अद्याप टिकून असल्याची ग्वाही त्या देतात. परंतु भारत-पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिकेचे पर्व पुन्हा सुरू झाले, तर ती मालिका अत्यंत रंगतदार होईल. याचप्रमाणे कसोटी क्रिकेटच्या ते भल्याचे ठरेल,’’ असे मत वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांनी सध्याच्या कसोटी क्रिकेटविषयी भाष्य करताना व्यक्त केले.

राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील कसोटी क्रिकेट स्थगित झाले आहे. दहा वर्षांपूर्वी या दोन संघांमध्ये अखेरचा कसोटी सामना झाला होता. वेस्ट इंडिजला सोनेरी दिवस दाखवणाऱ्या ६५ वर्षीय रिचर्ड्स यांनी कसोटी क्रिकेट, भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, कॅरेबियन क्रिकेटची सद्य:स्थिती याबाबत केलेली बातचीत-

  • विराट कोहलीच्या खेळात मला माझ्या खेळाची झलक दिसते,’ असे उद्गार काही वर्षांपूर्वी तुम्ही काढले होते. त्याचे कोणते गुण तुम्हाला आवडतात?

विराटचा खेळाकडे पाहण्याचा आक्रमक दृष्टिकोन मला अतिशय आवडतो. त्यामुळे त्याची फलंदाजी पाहणे मला मनापासून आवडते. देशाचे प्रतिनिधित्व करताना तो एखाद्या सैनिकाप्रमाणेच मैदानावर निर्भीडपणे लढतो. कठीण परिस्थितीत तो धीरोदात्तपणे खेळपट्टीवर उभा राहतो. पळपुटेपणा त्याच्यात कुठेही दिसत नाही. हे गुण नैसर्गिक, अंगभूत असतात. ते कुणालाही शिकवता येत नाहीत. सचिन तेंडुलकरनंतर भारतीय क्रिकेट क्षितिजावर हा नवा महानायक उदयास येत आहे.

  • नुकत्याच झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेची तुम्ही कशा प्रकारे मीमांसा कराल?

एक अप्रतिम कसोटी मालिका म्हणून मी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे वर्णन करीन. काही वाद या मालिकेत घडले, परंतु त्यांनी खेळाच्या मर्यादा ओलांडता कामा नये. लवकरच फुटबॉलप्रमाणेच पंचांकडेसुद्धा कार्ड्स असणार आहेत. त्यामुळे हे वादसुद्धा कमी होतील.

  • कसोटी मालिकेसाठी यजमान संघ स्वत:ला अनुकूल खेळपट्टय़ा करतो आणि वर्चस्व गाजवतो, ही प्रथा योग्य आहे का, की आयसीसीने त्रयस्थ पद्धतीने खेळपट्टी तयार करावी?

त्रयस्थ वगैरे अजिबात नको. प्रचलित पद्धतीच योग्य आहे. यजमान संघ आपल्या वातावरणाशी अनुकूल खेळपट्टय़ा तयार करतो. पाहुण्या संघाने आपल्या क्षमतेनुसार खेळून परदेशातसुद्धा वर्चस्व गाजवल्याची उदाहरणे आहेत. आता भारतात झालेल्या मालिकेत त्यांनी आपल्याला अनुकूल फिरकी खेळपट्टय़ा तयार केल्या. हीच गोष्ट जेव्हा भारत ऑस्ट्रेलियात जाईल तेव्हा पाहायला मिळेल आणि वेगवान गोलंदाजांचा पराक्रम पाहायला मिळेल.

  • वेस्ट इंडिजच्या कसोटी क्रिकेटबाबत काय सांगाल?

काही देशांमध्ये कसोटी क्रिकेटचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे. या देशांमध्ये वेस्ट इंडिजचा समावेश होऊ शकणार नाही. विंडीजचा संघ या प्रकारात सध्या झगडतो आहे. गेली अनेक वष्रे कसोटी क्रिकेटमध्ये दिग्गज संघाला हरवण्याचा पराक्रम या संघाला करता आलेला नाही. संघटनेचे पदाधिकारी आणि खेळाडू यांच्यातील वादामुळे विंडीजच्या क्रिकेटची पीछेहाट झाली आहे. यावर मात केल्यास वेस्ट इंडिजचे कसोटी क्रिकेटसुद्धा नावारूपास येईल, अशी आशा धरायला हरकत नाही.

  • कॅरेबियन क्रिकेट गेली काही वष्रे कठीण परिस्थितीतून जात आहे. त्याचे कशा प्रकारे विश्लेषण कराल?

विंडीजच्या क्रिकेटपटूंना बऱ्याच पातळ्यांवर झगडावे लागत आहे. ही परिस्थिती सुधारावी अशी कॅरेबियन क्रिकेटरसिकांप्रमाणेच खेळाडूंचीही अपेक्षा आहेत. ट्वेन्टी-२०चे जगज्जेतेपद पटकावल्यानंतरही खेळाडूंच्या वाटय़ाला चांगले दिवस आले नाहीत. सध्या कार्यरत असलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळातील पदाधिकाऱ्यांना आपण देशातील खेळाची प्रगती करीत आहोत, असा भ्रम आहे. पण ते आपले काम योग्य पद्धतीने करीत नाहीत. ते पूर्णत: अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. दर्जेदार क्रिकेट संघटकांची देशाला नितांत आवश्यकता आहे. खेळाडू आणि संघटक यांच्यातील संघर्ष संपेल, तेव्हाच कॅरेबियन क्रिकेटचा विकास होऊ शकेल.

  • चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत कोणत्या संघांकडून चांगल्या अपेक्षा असतील?

इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत रंगतदार सामन्यांची पर्वणी क्रिकेटरसिकांना अनुभवता येईल. इंग्लंडचा संघ समतोल असल्यामुळे त्यांच्याकडून सर्वाधिक अपेक्षा असतील. विश्वविजेते ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड हे संभाव्य विजेते ठरू शकतात. वेस्ट इंडिजलाही या पंक्तीत स्थान द्यायला मला आवडेल. बांगलादेशचा संघसुद्धा धक्कादायक कामगिरी करून लक्ष वेधेल.

  • निवृत्तीनंतर क्रिकेटमधील कोणती गोष्ट करता न आल्याची खंत वाटते?

ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळता न आल्याची खंत जरूर वाटते. या प्रकारात फलंदाज आक्रमकपणे फलंदाजी करतो, गोलंदाजाचाही कस लागतो. याचप्रमाणे क्षेत्ररक्षकांचे कौशल्यही पाहण्याजोगे असते.