विश्वविजेतेपद गमावल्यानंतर भारताच्या विश्वनाथन आनंदने लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्याच सामन्यात विजय मिळवून दमदार सुरुवात केली. गुरुवारी इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्सविरुद्धचा दुसरा डाव बरोबरीत सोडवून माजी विश्वविजेत्या आनंदने संयुक्तपणे अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
पाच वेळा विश्वविजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या आनंदने सलामीच्या लढतीत ल्युक मॅकशेन याचा पराभव करत आपला ४४वा वाढदिवस थाटात साजरा केला होता. त्यानंतर अ‍ॅडम्सविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून आनंदने प्राथमिक फेरीत चार गुणांनिशी अ‍ॅडम्ससह संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. या स्पर्धेत १६ जणांनी भाग घेतला असून, त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन जण बाद फेरीत मजल मारतील. चांगली सुरुवात करता आल्यामुळे आनंदने बाद फेरीतील स्थान निश्चित समजले जात आहे.