माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला सलग चौथ्या लढतीत बरोबरीत समाधान मानावे लागल्यामुळे त्याचे लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान संपुष्टात आले आहे. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळण्याचा फायदा आनंदला उठवता आला नाही, त्यामुळे त्याला नेदरलँड्सच्या अनिश गिरीविरुद्धची लढत बरोबरीत सोडवावी लागली.
या स्पर्धेची एक फेरी शिल्लक असून गिरी आणि व्लादिमिर क्रॅमनिक यांनी सहा गुणांनिशी संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे. आनंद ४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने पाच गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे.
क्विन्स गॅम्बिट प्रकाराने डावाची सुरुवात केल्यानंतर अनिश गिरीने रचलेल्या सापळ्यामुळे आनंदला सुरुवातीलाच प्यादे गमवावे लागले. आनंदने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्याचे डावपेच यशस्वी होऊ शकले नाहीत. दोघांनीही एकमेकांचे मोहरे टिपण्यावर भर दिला. विजय मिळवण्याची सूतराम शक्यता नसताना दोघांनीही बरोबरी पत्करण्याचे मान्य केले. अखेरच्या फेरीत आनंदची लढत इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्सशी होणार आहे. या डावात आनंदला काळ्या मोहऱ्यांनिशी खेळावे लागणार असल्यामुळे त्याला विजय मिळवणे कठीण जाणार आहे.
दुसऱ्या लढतीत रशियाच्या क्रॅमनिकने इटलीच्या फॅबिआनो कारुआनाविरुद्ध बरोबरी पत्करली. हिकारू नाकामुराने सुरेख खेळ करत मायकेल अ‍ॅडम्सवर मात केली. या विजयामुळे नाकामुराने दुसऱ्या स्थानी झेप घेतली.