माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेतील अटीतटीच्या लढतीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. या स्पर्धेसाठी चोख तयारी केल्याचे आनंदने दाखवून दिले, मात्र त्याला विजयासाठी अद्याप संघर्ष करावा लागत आहे. आनंदने सुरुवातीपासूनच आक्रमक चाली रचत नाकामुरावर दडपण आणले, पण नाकामुराने खेळाच्या मध्यात विस्मयकारक चाली रचत आनंदला गोंधळात टाकले. त्यामुळे आनंदने डाव बरोबरीत सोडवण्यात धन्यता मानली. दुसऱ्या फेरीअखेर रशियाचा व्लादिमिर क्रॅमनिक आणि नेदरलँड्सचा अनिश गिरी यांनी पाच गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंडचा मायकेल अ‍ॅडम्स  चार गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. आनंद तीन गुणांसह चौथ्या स्थानी आहे. नाकामुरा आणि इटलीचा फॅबिआनो कारुआना दोन गुणांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहेत.