लोकांनी, लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही, ही अमेरिकेचे महान राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील लोकांनी, महाराष्ट्रातील खेळाडूंच्या हिताकरिता, महाराष्ट्रातील लोकांकरवी चालवलेली स्पर्धा म्हणजे ‘महाकबड्डी लीग’ असे म्हणता येईल. महाकबड्डीच्या मुंबईतील पहिल्याच टप्प्यात सुरजितसिंग नगर चॅलेंजर्सकडून खेळला आणि या व्याख्येला गालबोट लागले. याबद्दल नगरला आर्थिक दंड ठोठावण्यात आला. नगरचे काय चुकले? तर सुरजितला खेळवण्यापूर्वी नगर संघाने संयोजकांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेतले नव्हते. कारण तो नगरच्या दहा खेळाडूंच्या मूळ यादीत नव्हता. परंतु सर्वात महत्त्वाचे कारण दिले गेले ते म्हणजे सुरजित महाराष्ट्रातील नोंदणीकृत खेळाडू नाही. मात्र मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सुरजितची शिवनेरी संघाचा खेळाडू म्हणून नोंद आहे. नगर चॅलेंजर्स विरुद्ध ठाणे टायगर्स या सामन्यात सुरजितने काही क्षणांतच आपल्या खेळाने कबड्डीरसिकांचे पारणे फेडले होते. परंतु कालांतराने तो सामना अतिशय कंटाळवाणा झाला. पण यानिमित्ताने अनेक प्रश्न समोर आले.

महाकबड्डीच्या संयोजकांची या स्पध्रेची व्याख्या किती तकलादू आहे, हे स्पष्ट झाले. प्रो-कबड्डी लीगच्या विरोधात ही स्पर्धा नाही, असे एकीकडे संयोजक म्हणतात. परंतु दुसरीकडे प्रो-कबड्डीच्या खेळाडूंना मात्र या स्पध्रेत प्रवेश नाही. पण प्रो-कबड्डीसंदर्भातील मालक मात्र यांना कसा काय चालतो? हा मालक कागदोपत्री विदर्भाचा खेळाडू आहे. म्हणजेच ‘वेगळ्या राज्या’चा! मग त्याला ‘ना हरकत’ प्रमाणपत्र कसे काय मिळते? प्रो-कबड्डीतील महाराष्ट्राच्या खेळाडूंना वगळून महाकबड्डीची योजना पुरुष विभागासाठी तरी अपयशी ठरलेली नाही. पण कालांतराने महिलांची प्रो-कबड्डी लीग सुरू होईल. स्नेहल शिंदे, अभिलाषा म्हात्रे, नेहा घाडगे, स्नेहल साळुंखे, किशोरी शिंदे, सायली केरिपाळे, आदी अव्वल खेळाडू त्यांच्याशी करारबद्ध झाल्या तर महाकबड्डीतील रोमहर्षकता टिकवू शकतील, अशी दुसरी फळी महाराष्ट्रात अस्तित्वात आहे का? गेल्या काही वर्षांतील राज्य अजिंक्यपद स्पध्रेकडे जरी लक्ष दिले तरी यामागील जळजळीत वास्तव समोर येईल.

भारतीय रेल्वे म्हणजे महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पध्रेत आव्हान ठरणारा प्रतिस्पर्धी. परंतु याच रेल्वेने महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंच्या रोजगाराचा प्रश्न अनेक वष्रे सोडवला, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण आता महाराष्ट्र शासनाप्रमाणेच अनेक कंपन्या रोजगारासाठी सक्षमपणे उभ्या राहू लागल्याने आता महाराष्ट्राच्या खेळाडूंना रेल्वेची स्वप्न पडणे कमी होऊ लागले आहे. पण राष्ट्रीय स्पध्रेत रेल्वे हा स्वतंत्र संघ म्हणून उतरतो. मग या रेल्वेचे खेळाडू महाराष्ट्राला कसे काय चालतात? पुरुष आणि महिला खेळाडूंच्या लिलावात रेल्वेचे काही खेळाडू अग्रेसर होते. याप्रमाणे पुरुष आणि महिला दोन्ही विभागांमधील संघांमध्ये रेल्वेच्या खेळाडूंचा विशेष भरणा आहे. महाकबड्डी महाराष्ट्राची हे छातीठोकपणे सांगणारे संयोजक रेल्वेच्या खेळाडूंना वगळण्याचे धारिष्टय़ दाखवू शकतील का?

पण महाकबड्डीचा आयपीएलप्रमाणेही विचार करता येऊ शकतो. आयपीएलच्या प्रत्येक संघात किती परदेशी खेळाडू खेळवायचे याचे गणित निश्चित करण्यात आले आहे. महाकबड्डीवाल्यांनी प्रत्येक संघात सातपैकी एक किंवा दोन अन्य राज्यांचे खेळाडू खेळवल्यास लीगचा दर्जा उंचावेल. परदेशी खेळाडूंमुळे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत झालेली सुधारणा आयपीएलच्या निमित्ताने सर्वानीच पाहिली आहे.

प्रो-कबड्डीच्या यशात थेट प्रक्षेपण करणाऱ्या क्रीडा वाहिनीचा, मशाल स्पोर्ट्सचा आणि चारू शर्मा यांचा सिंहाचा वाटा होता. महाकबड्डी लीगचे शिवधनुष्य पेलण्यासाठी अर्जुनवीर शांताराम जाधव यांनी अपार मेहनत घेतली, परंतु तरीही महाकबड्डीच्या यशाला मर्यादा आल्या. महाकबड्डी लीगचे संयोजक, संघांचे मालक आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ब्रँडिंगमध्ये कमी पडले. आयपीएल स्पध्रेप्रसंगी स्टेडियमबाहेर भरणारी जत्रा मराठमोळ्या पद्धतीने संयोजकांना साकारता आली असती. प्रो-कबड्डीत खेळाडूंची वैशिष्टय़े, त्यांचा व्यक्तिवेध मांडून क्रीडारसिकांना आधीच सज्ञान करण्यात आले होते. आता प्रो-कबड्डीच्या दुसऱ्या हंगामाला सामोरे जाण्यासाठी काही महिने अगोदरपासूनच संयोजकांनी कंबर कसली आहे. पण महाकबड्डी लीगचे दुर्दैव म्हणजे थेट प्रक्षेपण करण्यासाठीसुद्धा त्यांना झगडावे लागले. अखेर एका ‘पॉवरफुल’ राजकीय व्यक्तीच्या शब्दामुळे त्यांच्याच ‘घरातल्या’ वाहिनीकडे थेट प्रक्षेपणाचे हक्क देण्यात आले. मात्र त्यासाठी संयोजकांना काही कोटींची किंमत मोजावी लागली.

५० लाख रकमेची छत्रपती शिवाजी करंडक स्पर्धा मार्च महिन्यात उरकण्याचे सोपस्कार राज्य शासन आणि राज्य कबड्डी असोसिएशन दरवर्षी कोणताही धडा न घेता पार पाडते. महाकबड्डीच्या तारखा निवडतानाही हाच घोळ घातला गेला आणि सुटीच्या मे महिन्यात ही स्पर्धा घेण्यात आली. संयोजकांनी तिकीट विक्रीसाठी सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आणि ठिकाणी ही व्यवस्था करायला हवी होती, परंतु त्याचे गांभीर्य त्यांना अखेपर्यंत उमगले नाही. कोणत्याही लीगच्या यशात मनोरंजनाचा तडका अभिप्रेत असतो. प्रो-कबड्डीवाल्यांनी खेळ जरी गांभीर्याने दाखवला तरी चित्रपट-टीव्ही-उद्योग-राजकीय विश्वातील मान्यवरांना त्यांनी कबड्डीच्या मैदानापर्यंत आणले. त्याचे महत्त्व महाकबड्डीच्या संयोजकांना अद्याप समजलेले नाही.

महाकबड्डी लीगचा पुण्यातील अखेरचा टप्पा क्रीडा संकुल अनुपलब्ध असल्यामुळे पुढे ढकलण्यात आला, असे कारण संयोजकांनी सांगितले आहे. परंतु संघमालकांकडून आर्थिक देणी न आल्यामुळे तारखा पुढे गेल्याचीही कबड्डीविश्वात चर्चा आहे. कोणत्याही लीगचा डोलारा हा खंबीर आर्थिक पायावर उभा असतो. हे गणित साकारल्यास स्पर्धा यशस्वी होते. अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार किंवा कुशल संघटक जया शेट्टी जर या संयोजनात असते, तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते, असेही मत कबड्डीमधील जाणकार व्यक्त करतात. महाकबड्डीला प्रो-कबड्डीची उंची मात्र गाठता आली नाही. शेळीने वाघाचे कातडे घातले तरी ती वाघ होऊ शकत नाही, हे सत्य मात्र सहजपणे अधोरेखित होते. तूर्तास, एका वर्षांत दोन महाकबड्डीचे हंगाम खेळवण्याचे उद्दिष्ट राखणाऱ्या संयोजकांना हे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी शुभेच्छा. कोणताही खेळ किंवा स्पर्धा खेळाडूंच्या बळावर चालते. त्यामुळे लीग मोठय़ा होऊ देत आणि खेळाडूंच्या पदरी लिलावात बोली लागलेल्या रकमांहून अधिक पैसा येऊ दे, हीच कबड्डीप्रेमींची प्रार्थना आहे.