ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जर भारताने पहिली लढत गमावली तर, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उर्वरित सामन्यांत त्यांना असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने दिला आहे.

भारत-ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून अ‍ॅडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात ही लढत खेळली जाणार आहे. या कसोटीनंतर कोहली पितृत्वाच्या रजेमुळे भारतात परतणार आहे. ‘‘कसोटी मालिकेतील पहिल्याच लढतीत भारताने वर्चस्व गाजवणे गरजेचे आहे. कोहली ही एकमेव कसोटीच खेळणार असल्याने मायदेशी परतण्यापूर्वी तो संघाला कशा प्रकारे दिशा दाखवतो, हे महत्त्वपूर्ण ठरेल,’’ असे कुंबळे म्हणाला.

‘‘दोन वर्षांपूर्वीसुद्धा भारताने पहिली कसोटी जिंकून त्यानंतर मालिकेत २-१ असे यश संपादन केले. त्यावेळच्या तुलनेत आताचा ऑस्ट्रेलियन संघ अधिक भक्कम असल्याने भारताने पहिला सामना किमान अनिर्णीत राखणेदेखील मोठी गोष्ट ठरेल. त्यामुळे हा सामना जिंकून भारताने उर्वरित मालिकेसाठी पायाभरणी करावी,’’ असेही कुंबळेने सांगितले. त्याशिवाय भारताचे गोलंदाज यावेळीही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना हैराण करतील, असे कुंबळेने नमूद केले.