जागतिक कुस्ती स्पर्धा

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या मल्लांची निराशाजनक कामगिरी रविवारीही सुरूच राहिली. रवी याने भारताला एकमेव लढत जिंकून दिली, पण त्यानंतर त्याचे आव्हान संपुष्टात आले.

ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात भारताच्या तीन कुस्तीपटूंना ऑलिम्पिकमध्ये स्थान पटकावण्याची संधी होती. पण मनीष (६७ किलो), सुनील कुमार (८७ किलो) आणि रवी (९७ किलो) यांना रविवारी पराभवाचा सामना करावा लागला.

रवीने चायनीज तैपेईच्या चेंग हाओ चेन याला पहिल्या लढतीत पराभूत केले. रवीने चेनला खाली पाडत दोन गुण मिळवले, त्यानंतर त्याने बचावात्मक पवित्रा अवलंबला. दुसऱ्या फेरीत अतिआक्रमकता दाखवल्यामुळे तैपेईच्या कुस्तीपटूने एक गुण गमावला, याचाच फायदा उठवत रवीने आणखी दोन गुणांची कमाई केली आणि ही लढत ५-० अशा फरकाने जिंकली. त्यानंतर रवीला चेक प्रजासत्ताकच्या आर्थर ओमारोव्ह याच्याकडून ०-७ असा पराभव पत्करावा लागला.

अमेरिकेच्या जोसेफ पॅट्रिक राऊ याने सुनील कुमारचा ६-० असा धुव्वा उडवला. मनीष कुंडूला बल्गेरियाच्या देयविड दिमित्रोव्ह याने १-१० असे पराभूत केले.

जागतिक स्पर्धेचा दर्जा उंचावला असून त्यात आपले मल्ल पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. हे निकाल अपेक्षितच होते. येथे विजय मिळवणे कठीण बनले आहे. गुरप्रीत सिंग सोमवारी रिंगणात उतरणार असून त्याच्याकडे कडवी लढत देण्याची क्षमता आहे.

– हरगोविंद सिंग, राष्ट्रीय प्रशिक्षक