एमपीएल स्पोर्ट्स अ‍ॅपॅरल आणि अ‍ॅक्सेसरीज हे पुढील तीन वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट साहित्याचे नवे पुरस्कर्ते निश्चित झाले आहेत. परंतु ‘बीसीसीआय’ला प्रति सामन्यांसाठी नायकेच्या ८८ लाख रुपयांच्या तुलनेत एमपीएलकडून फक्त ६५ लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे ‘बीसीसीआय’ प्रति सामन्यास २३ लाखांचा तोटा सहन करावा लागणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्याने सोमवारी एमपीएल कंपनीशी करार झाल्याची माहिती दिली. ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट साहित्याचा करार भारताच्या पुरुष, महिला, ‘अ’ संघ आणि युवा (१९ वर्षांखालील) संघांसाठी करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय’ला विक्रीसंदर्भातील स्वामित्व हक्कापोटी आणखी १० टक्के रक्कमसुद्धा मिळू शकेल. हा करार नोव्हेंबर २०२३ पर्यंत कार्यरत असेल.

एमपीएल हे सध्या ‘आयपीएल’मधील कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु या संघांशी करारबद्ध आहेत. याचप्रमाणे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ट्रिनबागो नाइट रायडर्स, आर्यलड आणि संयुक्त अरब अमिरातीशी करारबद्ध आहे.

प्युमा, अ‍ॅडिडासची माघार

प्युमा आणि अ‍ॅडिडास या कंपन्यांनी क्रिकेट साहित्य पुरस्कृत करण्यासाठीच्या निविदांचे कागदपत्र मिळवले होते. परंतु पायाभूत रकमेच्या एकतृतीयांश रकमेपर्यंत हा करार खालावेल, या भीतीपोटी या कंपन्यांनी निविदाच भरल्या नाहीत. याआधी, ‘बीसीसीआय’चा नायकेशी असलेला पाच वर्षांचा करार सप्टेंबरमध्ये संपुष्टात आला. २०१६ ते २०२० या कालावधीतील या करारातून ‘बीसीसीआय’ला ३७० कोटी रुपये मिळायचे. याशिवाय स्वामित्व हक्काच्या ३० कोटींचा समावेश होता.