करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्यामुळे अमेरिकेच्या ऑलिम्पिक संघाचा आर्थिक कणा मोडकळीस आला आहे. अमेरिकेतील ५० पैकी ४३ राष्ट्रीय क्रीडा संघटनांना फेब्रुवारी ते जून या कालावधीत जवळपास ९०५ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे.

अमेरिकेच्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समितीला खेळाडूंची तयारी करण्यासाठी याच क्रीडा संघटनांकडून निधी आणि अन्य मदत पुरवली जाते. राष्ट्रीय क्रीडा संघटनांकडून खेळाडूंना ८० टक्के मदत केली जाते.

अमेरिका टेनिस संघटनेला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमुळे जवळपास पाच हजारपेक्षा जास्त कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. नॅशनल बास्केटबॉल लीगमधून जवळपास ८ अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल जमा केला जातो. मात्र अर्ध्यापेक्षा जास्त क्रीडा संघटना या फक्त नावापुरत्याच आहेत. मर्यादित कर्मचाऱ्यांसह चालवल्या जाणाऱ्या या संघटनांकडून फक्त ३७ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला जातो.

आता ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्यामुळे या संघटनांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिक वर्षांतच आता पगारकपातीचा सामना खेळाडू, प्रशिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना करावा लागणार आहे. अमेरिकन सायकलिंग संघटनेने आपल्या ७०पैकी आठ कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे, तर अमेरिकन रग्बी संघटना दिवाळखोरीत सापडली आहे.

अ‍ॅटलेटिको, इस्पान्योलचे पगारकपातीचे धोरण

अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि इस्पान्योल या ला लीगा फुटबॉलमधील अव्वल क्लब्जनी आता खेळाडू तसेच कर्मचाऱ्यांसाठी पगारकपातीचे धोरण राबवले आहे. स्पेनला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून या देशातील फुटबॉल स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. अ‍ॅटलेटिको माद्रिद क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिग्यूएल अँजेल गिल यांनी सांगितले की, ‘‘फुटबॉल बंद असल्यामुळे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरती बेरोजगार योजना राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर कर्मचारी आणि खेळाडूंचे पगारही कापण्यात येणार आहेत.’’

न्यूझीलंडच्या रग्बीपटूंची वेतनकपात

करोनामुळे सर्व व्यावसायिक रग्बी स्पर्धा रद्द करण्यात आल्यामुळे आता न्यूझीलंड रग्बी संघटनेने प्रशिक्षक तसेच खेळाडूंचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड रग्बी संघटनेचा महसूल घटल्यामुळे मुख्य प्रशिक्षक इयान फॉस्टर यांच्यासह सहप्रशिक्षकांनी पगार कमी घेण्यास सहमती दर्शवली आहे.