इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर आगामी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित होते. परंतु संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने या अपयशी खेळाडूंना अभय देत कोलकात्यामध्ये ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात कोणतेही बदल केलेले नाहीत.
दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज उमेश यादवऐवजी बंगालच्या अशोक दिंडाला संधी देण्यात आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे दिंडाला अहमदाबादला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर यादवच्या पाठीची दुखापत बळावल्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही.
‘‘चौथा कसोटी सामना आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका यासाठी भारतीय संघाची निवड नंतर जाहीर करण्यात येईल,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय जगदाळे यांनी सांगितले.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील दुसरा कसोटी सामना भारताने चार दिवसांच्या आतच १० विकेट राखून गमावला. त्यानंतर अपयशी सचिन तेंडुलकरच्या कामगिरीवर जोरदार टीका झाली. सचिनला मागील कसोटी सामन्यांमधील मागील १० डावांमध्ये १५.३च्या सरासरीने फक्त १५३ धावाच करता आल्या आहेत. अहमदाबाद कसोटीत १३ तर वानखेडेवरील दोन्ही डावांमध्ये अनुक्रमे ८ आणि ८ धावा सचिनला काढता आल्या होत्या. भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनीही सचिनने निवड समितीशी सल्लामसलत करून भवितव्याचा निर्णय घ्यावा, असे वक्तव्य केले. त्यानंतर सचिनच्या कामगिरीची आणि निवृत्तीची चर्चा माजी क्रिकेटपटू आणि समीक्षकांनी जोरदारपणे केली.
याचप्रमाणे भारताच्या फिरकी माऱ्यामध्ये वैविध्य असावे, या कारणास्तव लेग-स्पिनरचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता होती. परंतु निवड समितीने आर. अश्विन, प्रग्यान ओझा आणि हरभजन सिंग या फिरकी त्रिकुटावरच आपला विश्वास प्रकट केला आहे. वानखेडेवर फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर ओझावगळता बाकी दोघेही अपयशी ठरले होते. मुंबई कसोटीत हरभजनने २३ षटकांमध्ये दोन बळी घेतले, तर अश्विन आणि ओझा यांनी प्रत्येकी ४५ षटके गोलंदाजी केली होती.
सलामीवीर गौतम गंभीरलाही अपेक्षित फलंदाजी करता आली नव्हती. परंतु मुंबईतील कसोटीच्या दुसऱ्या डावात झुंजार अर्धशतक झळकावून गंभीरने आपले स्थान टिकविले आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारताने अनेक ऐतिहासिक विजय मिळविले आहेत. याच मैदानावर तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. त्यानंतर १३ ते १७ डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये चौथा आणि अखेरचा कसोटी सामना रंगणार आहे. त्यानंतर पुणे आणि मुंबईमध्ये अनुक्रमे २० आणि २२ डिसेंबरला दोन ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत.    

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ :
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, चेतेश्वर पुजारा, आर. अश्विन, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, इशांत शर्मा, मुरली विजय आणि झहीर खान.