भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला बरोबरीची कोंडी फोडण्यात अद्याप यश मिळालेले नाही. त्यामुळेच येथे सुरू असलेल्या ग्रेन्को क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला गेला. त्याला जर्मनीच्या डॅनियल फ्रिडमन याने बरोबरीत रोखले.
आतापर्यंत झालेल्या चारही फे ऱ्यांमध्ये आनंदला बरोबरी स्वीकारावी लागली आहे. सहा खेळाडूंच्या या स्पर्धेत आनंद हा फ्रिडमन याच्या साथीत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. इटलीच्या फॅबिआनो कारुआना याने तीन गुणांसह आघाडी कायम राखली आहे. आर्कदिज नैदितिश याने अडीच गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. मायकेल अ‍ॅडम्स याने आतापर्यंत दीड गुणांची कमाई केली आहे. कारुआना याने अ‍ॅडम्सविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला. नैदितिश याने जॉर्ज मेईर याला पराभूत केले.
आनंद व फ्रिडमन यांच्यातील डाव अतिशय रंगतदार झाला. आनंद याला या डावात विजयाची संधी होती. ४७ चालीपर्यंत आनंदने डावावर नियंत्रण राखले होते. ४८व्या चालीला त्याने चुकीची चाल करीत विजयाची हुकमी संधी दवडली. त्यानंतर डाव बरोबरीत ठेवण्याखेरीज त्याच्यापुढे अन्य कोणताच पर्याय उरला नव्हता. ५८व्या चालीला त्याने बरोबरी मान्य केली.