इंडियन क्रिकेट लीगमध्ये सहभागी झालो असताना २००८ मध्ये एका भारतीय सट्टेबाजाने स्वत:ची ओळख क्रीडा साहित्य उत्पादक असल्याचे सांगत मला मॅचफिक्सिंगच्या जाळ्यात ओढले व त्यामध्ये मी नकळत फसलो, अशी कबुली आजीवन बंदी घातलेला न्यूझीलंडचा क्रिकेटपटू लो व्हिन्सेंटने दिली.
न्यूझीलंडच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना व्हिन्सेंटने ही कबुली दिली. तो म्हणाला,‘‘ भारतामधील या स्पर्धेत अनेक नवीन खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळेल या उत्सुकतेने मी सहभागी झालो. त्या वेळी एका माणसाने मला विविध क्रीडा साहित्यासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करण्याविषयी सांगितले. मी लगेच तयारही झालो. मात्र प्रत्यक्षात मला सट्टेबाजीच्या जाळ्यात ओढले गेले. संबंधित माणूस हा कोणत्याही क्रीडा साहित्य उत्पादनाशी संबंधित नव्हता, तर तो एक सट्टेबाज होता हे मला खूप उशिराने लक्षात आले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता.’’