घरापासून दूर राहणे आणि कठीण प्रसंगातून जात असताना कुटुंबाजवळ नसणे, हा सर्वात मोठा त्याग असल्याचे बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने सांगितले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये लव्हलिनाचा उपांत्य फेरीत पराभव झाल्याने तिचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले, मात्र पराभूत झाल्यानंतरही कांस्यपदक जिंकत लव्हलिनाने नवा विक्रम रचला. ईशान्य भारतामधील राज्यांमधून आलेली आणि ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी लव्हलिना तिसरी महिला आहे. तसेच मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांच्यानंतर बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

पीटीआयशी बोलताना लव्हलिना म्हणाली, ”गेल्या आठ वर्षांपासून घरापासून दूर राहणे आणि अडचणींच्या वेळी कुटुंबाच्या जवळ नसणे आणि या सर्व गोष्टी लांबून पाहणे, हा सर्वात मोठा त्याग आहे. वैयक्तिकरित्या, मी माझ्यासारख्या तरुणांना असलेल्या काही इच्छांचा त्याग केला आहे. उदाहरणार्थ माझ्या वयाचे इतर लोक फास्ट फूड खातात. खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी प्रशिक्षणात खड्डा पडू दिला नाही. आठ वर्षांपासून हे असेच सुरू होते.”

लव्हलिनाने ऑलिम्पिकमधील आपल्या आठवणी कोणत्या होत्या याबद्दलही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ”सर्वात चांगली आठवण म्हणजे, मी अशा बॉक्सरला पराभूत करण्यात यशस्वी ठरली, जिने मला येथे येण्यापूर्वी चार वेळा हरवले होते. ऑलिम्पिकमध्ये तिला हरवणे हा माझ्या कारकिर्दीतील एक खास क्षण आहे.”

हेही वाचा – मी माझं पदक उशाशी घेऊन झोपलो – नीरज चोप्रा

दुसरी आठवण म्हणजे, उंच उडीत कतार आणि इटलीने संयुक्तपणे जिंकलेले सुवर्णपदक. या गोष्टीवरून मानवता अजून शिल्लक आहे, हे कळते. खेळ हे एकमेव माध्यम आहेस जे यासारख्या दोन भिन्न देशांना जोडू शकते”, असे लव्हलिनाने सांगितले.

टोक्योमधील दमदार कामगिरीनंतरही लव्हलिनाला सुवर्णपदक हुकल्याची खंत आहे. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या डोळ्यासमोर सुवर्णपदकाचे ध्येय आहे. पण या स्पर्धेच्या तयारीपूर्वी ती विश्रांती घेणार आहे.