क्रोएशियाविरुद्धच्या लढतीत ब्राझीलला पेनल्टी किक देण्याचा जपानी सामनाधिकारी युईची निशिमुरा यांचा निर्णय वादग्रस्त ठरला. क्रोएशियाचे खेळाडू, प्रशिक्षक, चाहत्यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली. दुसरीकडे ब्राझीलला जिंकून देण्यासाठी मदत केली म्हणून जपानमध्येही या निर्णयावर विरोधी पडसाद उमटले. मात्र एवढे सगळे घडूनही फिफाने निशिमुरा यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
क्रोएशियाच्या देजान लोव्हरेनने ब्राझीलचा आघाडीपटू फ्रेडला रोखण्याचा प्रयत्न करून त्याला पाडले. हे नियमांविरुद्ध असल्याने निशिमुरा यांनी ब्राझीलला पेनल्टी किक देण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात मात्र लोव्हरेनने केवळ त्याला जेमतेम हात लावल्याचे ‘रिप्ले’मध्ये स्पष्ट झाले होते. ही अक्षम्य चूक असल्याचे क्रोएशियातील प्रसारमाध्यमांनी म्हटले. ब्राझीलमधील मुख्य वृत्तपत्राने मुखपृष्ठावर या घटनेची दखल घेत अरिगाटो अर्थात जपानी भाषेत आभारी आहोत असा आशयाचे वृत्त दिले आहे. अशा पद्धतीच्या निर्णयांमुळे अन्य संघही या स्वरूपाच्या पेनल्टीवर अवलंबून राहण्याची शक्यता असल्याचे मत विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंनी व्यक्त केले.
फिफाने निशिमुरा पुढील लढतीतही सामनाधिकारी म्हणून कार्यरत असतील हे स्पष्ट केले आहे. त्यांच्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसल्याचे फिफाने सांगितले. फिफाचे मुख्य सामनाधिकारी मासिमो ब्युसाका यांनी निशिमुरा यांचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. ही घटना पाहण्यासाठी ते योग्य ठिकाणी होते. क्रोएशियाच्या खेळाडूने हाताने ब्राझीलच्या खेळाडूला पाडण्याचा प्रयत्न केला. पेनल्टी किक बहाल करण्यासाठी एवढे पुरेसे आहे असे त्यांनी पुढे सांगितले.