बॅडमिंटनपटू श्रीकांतची भावना

ऑलिम्पिकपूर्वीच्या वर्षभराच्या कालावधीत माझ्या कामगिरीत सातत्य नव्हते. मात्र या खडतर टप्प्यानेच ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा दिली, असे मत बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने व्यक्त केले.

२०१४मध्ये श्रीकांतने सार्वकालीन महान खेळाडू लिन डॅनला नमवत चीन सुपर सीरिज प्रीमिअर स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. सुपर सीरिज दर्जाच्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा श्रीकांत पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. त्यानंतर त्याने इंडिया सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई केली. दिमाखदार प्रदर्शनासह श्रीकांतने जागतिक क्रमवारीत तृतीय स्थानी झेप घेतली होती.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यापूर्वी झालेल्या स्पर्धामध्ये श्रीकांतच्या कामगिरीत घसरण झाली. श्रीकांतने सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. मात्र त्यानंतर त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र ढासळती कामगिरी होत असतानाही ऑलिम्पिक पात्रतेची चिंता नव्हती, असे श्रीकांतने सांगितले.

‘‘चांगला खेळलो तर गोष्टी बदलतील याची खात्री होती. खेळात सुधारणा केली. जागतिक क्रमवारीतील स्थानाची मला काळजी नव्हती. सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मला मिळत नव्हता. मी सातत्याने स्पर्धा खेळत होतो. या दरम्यान खेळातील उणिवांची जाणीव झाली. पराभवातून कसे शिकता येईल याचा अभ्यास केला,’’ असे श्रीकांत म्हणाला.

‘‘ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यावर प्रचंड आनंद झाला. मोठे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र होणेच खडतर आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. देशवासीयांना अभिमान वाटेल अशा कामगिरीसाठी अथक सराव सुरू आहे,’’ असे श्रीकांतने सांगितले.

लहानपणी टीव्हीवर ऑलिम्पिक कधी पाहिले नाही. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सायनाना खेळताना पाहिले. त्या वेळी ऑलिम्पिकच्या भव्यतेची कल्पना आली. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च स्पर्धेत खेळण्याची इच्छा बळावली.