मायदेशात झालेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंना पदक मिळविण्यात अपयश आले. मुलांमध्ये चीनच्या लु शांगलेईने विजेतेपद मिळविले. पदकांची अपेक्षा असलेल्या विदित गुजराथी या भारतीय खेळाडूला पाचवे स्थान मिळाले, तर पद्मिनी राऊतला मुलींमध्ये चौथा क्रमांक मिळाला.
मुलींमध्ये अ‍ॅलेक्झांड्रा गोर्याश्किनाने शनिवारीच बाराव्या फेरीत विजेतेपदावर मोहोर नोंदविली होती. तिने शेवटच्या फेरीत पोलंडच्या अ‍ॅना इवानोव्हा हिला बरोबरीत रोखले. तिने ११ गुणांसह दीड लाख रुपयांची कमाई केली. इराणची सारस्दात खादेमलशेरी व पेरूची खेळाडू अ‍ॅना चुम्पाताझ यांचे प्रत्येकी साडेनऊ गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. सारस्दात हिने शेवटच्या फेरीत भारताच्या श्रिजा शेषाद्री हिला पराभूत केले. चुम्पाताझ हिला शेवटच्या फेरीत उझबेकिस्तानच्या सर्विनोझ कुर्बानोव्हा हिच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. पद्मिनी राऊतने शेवटच्या फेरीत इटलीच्या मारिना ब्रुनेलो हिच्यावर ३८ चालींमध्ये शानदार विजय मिळविला. तिचे नऊ गुण झाले. कांस्यपदकासाठी तिला केवळ अर्धा गुण कमी पडला. भारताच्या श्रिजा शेषाद्री हिने दहावे स्थान मिळविले. मुलांमध्ये बाराव्या फेरीअखेर लु शांगलेई, वेई येई (चीन), व्लादिमीर फेदोसोव्ह (रशिया), दुदा जॉन क्रिस्तोफ (पोलंड) हे आघाडीवर होते. त्यामुळे शेवटच्या फेरीविषयी कमालीची उत्कंठा होती.
शांगलेई याने सर्बियाच्या अ‍ॅलेक्झांडर इन्दीजिक याला केवळ ३१ चालींमध्ये पराभूत केले. त्याने १३व्या फेरीअखेर दहा गुण मिळवीत वेई येईला मागे टाकत सुवर्णपदकावर मोहोर नोंदविली. त्याला दीड लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. वेईला दुदा जॉन क्रिस्तोफ (पोलंड) याच्याविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. व्लादिमीर फेदासोवला कामिल ड्रॅगेन (पोलंड) याने बरोबरीत रोखले. शेवटच्या फेरीअखेर वेई, फेदोसोव व क्रिस्तोफ यांचे प्रत्येकी साडेनऊ गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दोन ते चार क्रमांक मिळाले. महाराष्ट्राच्या विदित गुजराथीने शेवटच्या फेरीत नेदरलँड्सच्या क्विन्टेन दुर्कामोन याच्यावर उल्लेखनीय विजय मिळविला आणि पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. त्याचे नऊ गुण झाले. शेवटच्या फेरीत भारताच्या मुरली कार्तिकेयन याने कोरी जॉर्ज (पेरू) याच्यावर आश्चर्यजनक विजय मिळविला. श्रीनाथ नारायणन याने रशियाच्या ओपरीन ग्रिगोरी याला पराभूत करीत अनपेक्षित विजय मिळविला.
श्रीनाथ व मुरली यांचेही प्रत्येकी नऊ गुण झाले. त्यांना अनुक्रमे सातवे व आठवे स्थान मिळाले. त्यांचाच सहकारी दीप्तायन घोष याला नववा क्रमांक मिळाला. शांगलेई व अ‍ॅलेक्झांड्रा यांनी या स्पर्धेतील विजेतेपदाबरोबरच पुढील वर्षी होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्चित केले.