X

आमच्यासाठी अभिमानाचा क्षण

प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मॅटोस यांचे प्रतिपादन

प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मॅटोस यांचे प्रतिपादन

शुक्रवारच्या संध्याकाळी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भारतीय संघ पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. हा क्षण केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर माझ्यासाठीही अभिमानास्पद आहे. मी खूप आतुर आहे. या स्पर्धेसाठी आम्ही कठोर परिश्रम घेतले आहेत आणि एक संघ म्हणून सर्वोत्तम खेळ करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन भारतीय कुमार फुटबॉल संघाचे प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मॅटोस यांनी केले.

पहिल्यांदाच फिफा विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतासमोर सलामीच्या लढतीत अमेरिकेचे आव्हान आहे. डी मॅटोस म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय फुटबॉल महासंघामुळे (एआयएफएफ) या इतिहासाचा साक्षीदार होण्याची संधी मला आणि या खेळाडूंना मिळाली आहे. ही स्पर्धा भारतातील फुटबॉलचे भविष्य बदलणारी ठरणार आहे. त्यामुळे या खेळाडूंवरील जबाबदारी अधिक वाढली आहे.’’

भारताचा कर्णधार अमरजीत सिंग म्हणाला की, ‘‘आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. घरच्यांपासून लांब राहावे लागले, परंतु आज देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत आहे. शुक्रवारच्या लढतीत प्रेक्षक येणे महत्त्वाचे आहे, ते नसतील तर आम्ही काहीच करू शकत नाही.’’

Outbrain