दशकभरापासूनच्या दोघा खेळाडूंचया साम्राज्याला प्रथमच धक्का देण्यात क्रोएशियाचा कर्णधार यशस्वी

लंडन : फुटबॉलच्या वैयक्तिक पुरस्कारांमध्ये लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे दशकभरापासूनचे साम्राज्य प्रथमच खालसा झाले आहे. यंदा फिफाचा वर्षभरातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार क्रोएशियाचा मध्यरक्षक ल्युका मॉडरिचला झाल्याने त्या दोघांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.

रिअल माद्रिदला तिसरे विजेतेपद मिळवून देण्यात तसेच क्रोएशियाला उपविजेतेपद मिळवून देण्यात त्याची भूमिका निर्णायक ठरली होती. मॉडरिचने मेसी, रोनाल्डो आणि इजिप्तचा आक्रमक महंमद सलाहलादेखील पिछाडीवर टाकले. अनेक वर्षे पुरस्कारांसाठी केवळ मेसी आणि रोनाल्डोचीच नावे चर्चेत असायची. मात्र, त्या दोघांव्यतिरिक्त मॉडरिच आणि सलाहचे नावदेखील आघाडीवर होते. यंदा मॉडरिचला पुरस्कार मिळाल्याने या पुरस्कारात मेसी आणि रोनाल्डोची यंदापर्यंत ५-५ अशी बरोबरी झाली आहे.मॉडरिचला पुरस्कार मिळाल्याने त्याच्या सावलीत त्याचा मागील क्लबसहकारी रोनाल्डो झाकोळला गेला आहे. रोनाल्डोनेदखील चॅम्पियन्स लीगमध्ये १५ गोल तसेच विश्वचषकात चार गोलसह दमदार कामगिरी बजावली होती. मात्र, बाद फेरीच्या प्रारंभीच पोर्तुगालचा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला उपांत्यपूर्व, उपांत्य किंवा अंतिम सामन्यात त्याला कौशल्य दाखवता आले नसल्याचा त्याला फटका बसला. सोमवारी रात्री झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला विजेत्याव्यतिरिक्त अन्य कुणीही मोठा खेळाडू न आल्याने त्याबाबतदेखील चर्चेला बहर आला आहे. मेसी आणि रोनाल्डो हे त्यांच्या ज्युवेन्ट्स व बार्सिलोना क्लबकडून खेळण्यात व्यस्त असल्याचे कारण देण्यात आले आहे. याबाबत बोलताना मॉडरिचने सांगितले, ‘‘येऊ न शकण्याची त्यांची कारणेदेखील योग्य आहेत. अर्थात ते दोघे इथे असते तर मला अधिक आवडले असते.’’

माझ्या हा खूप भावनिक क्षण असून मला मदत करणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टीनेदेखील त्याला खूप महत्त्व आहे. मला या स्थानापर्यंत पोहोचवण्यात अनेक जणांचे योगदान असून त्या सर्वाचा तो सन्मान आहे. माझ्यासाठी यंदाचा हंगाम हा अगदी अविश्वसनीय ठरला आहे. मी या वर्षांत खूप काही कमावले असल्याने माझ्यासाठी हे वर्ष खरोखरच संस्मरणीय ठरले आहे.

 ल्युका मॉडरिच

सर्वोत्तम गोल सलाहचा, गोलरक्षक थिबॉ

या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलचा पुरस्कार सलाहला देण्यात आला. एव्हर्टन क्लबविरुद्धच्या सामन्यात गत डिसेंबर महिन्यात केलेल्या गोलची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. तर बेल्जियमचा गोलरक्षक थिबॉ कोर्टाइस याला सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक देशॉ

फ्रान्सचे प्रशिक्षक डिडीएर देशॉ यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. फ्रान्सला विजेतेपद मिळवून देण्यात त्यांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची होती.

फिफप्रो सर्वोत्कृष्ट संघ

फिफाकडून दर वर्षीप्रमाणे यंदादेखील सर्वोत्कृष्ट संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मॉडरिचसह त्याचे संघ सहकारी सर्जिओ रामोस, राफेल वेराने, मार्सेलो, डेव्हिड डी गीआ, डॅनी अल्वेस, एनगोलो कांटे, एडन हॅझार्ड, किलीयान एम्बापे, मेसी आणि रोनाल्डोलादेखील स्थान देण्यात आले आहे.