अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या (एआयएफएफ) वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दोन वष्रे सुनील छेत्रीची असलेली मक्तेदारी मध्यरक्षक युजिन्सन लिंगडोहने मोडून काढली. एआयएफएफने रविवारी जाहीर केलेल्या पुरस्कारात पुरुष गटात ‘वर्षांतील सवरेत्कृष्ट खेळाडू’चा मान लिंगडोहला मिळाला, तर महिला गटात हा मान आघाडीपटू बाला देवीने पटकावला. सलग दुसऱ्यांदा बाला देवी या पुरस्काराची मानकरी ठरली. तिला चषक व एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. गोव्यातील मडगाव येथे एआयएफएफच्या पदाधिकाऱ्यांची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. त्यात ही घोषणा करण्यात आली. आय-लीग क्लबच्या प्रशिक्षकांनी केलेल्या मतदानानंतर लिंगडोहची निवड करण्यात आली असून त्याला चषक आणि दोन लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. ‘‘आय-लीगच्या प्रशिक्षकांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली, ही माझ्यासाठी खास बाब आहे. भविष्यात चांगली कामगिरी करण्यासाठी हे प्रोत्साहन आहे,’’ असे लिंगडोह म्हणाला. इतर पुरस्कारार्थी उदयोन्मुख खेळाडू : प्रीतम कोटल (पुरुष), प्यारी सासा (महिला) सर्वोत्तम फुटबॉल विकासक कार्य : ओदिशा फुटबॉल संघटना सर्वोत्तम सामनाधिकारी : सी. आर. श्रीक्रिष्णा सर्वोत्तम साहाय्यक सामनाधिकारी : सपम किनेड्डी