भारताचे माजी हॉकीपटू आणि प्रशिक्षक एम. के. कौशिक यांचे शनिवारी करोनामुळे निधन झाले. गेले तीन आठवडे त्यांची करोनाशी झुंज सुरू होती. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे.

१९८०मधील मॉस्को ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे कौशिक सदस्य होते. १७ एप्रिलला करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  प्रकृती ढासळल्याने शनिवारी सकाळी कौशिक यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. परंतु सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

कौशिक यांनी भारताच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. भारताच्या पुरुष संघाने कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८च्या आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक कमावले होते. तसेच महिला संघाने २००६मध्ये आशियाई क्रीडा स्पध्रेत कांस्यपदक मिळवले. कौशिक यांनी १९९८मध्ये अर्जुन, तर २००२मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त केला.