04 August 2020

News Flash

मुंबईतील हॉकी रसातळाला जाण्याच्या मार्गावर!

राष्ट्रीय शिबिरातील मुंबईकर हॉकीपटूंची संख्या रोडावत चालली आहे.

आठवडय़ाची मुलाखत : एम. एम. सोमया, माजी ऑलिम्पियन हॉकीपटू

तुषार वैती, लोकसत्ता

मुंबई : ‘एक राज्य, एक मत’ या नव्या संकल्पनेमुळे मुंबई हॉकीचे मोठे नुकसान होणार आहे. मुंबई या देशातील सर्वात जुन्या हॉकी संघटनेला आता संलग्न सदस्यत्वाचा दर्जा देण्यात आल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धामध्ये मुंबईचा संघ पाठवता येणार नाही. महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना मुंबईच्या खेळाडूंना मोजकी संधी मिळणार आहे. परिणामी खेळाडूंच्या नोकऱ्या धोक्यात येणार असून येत्या काळात मुंबईतील हॉकी खेळ रसातळाला जाईल, अशी भावना माजी ऑलिम्पियन हॉकीपटू एम. एम. सोमया यांनी व्यक्त केली.

‘‘गेल्या १० वर्षांत मुंबईतील हॉकीला घरघर लागली असून राष्ट्रीय शिबिरातील मुंबईकर हॉकीपटूंची संख्या रोडावत चालली आहे. एके काळी देशासाठी अनेक अव्वल हॉकीपटू घडवणाऱ्या मुंबईची हॉकी संकटात सापडली आहे,’’असे सोमया यांनी सांगितले. क्रीडा मंत्रालयाच्या नव्या नियमांविषयी आणि मुंबईतील हॉकीच्या सद्य:स्थितीविषयी १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते हॉकीपटू सोमया यांच्याशी केलेली ही बातचीत-

* ‘एक राज्य, एक खेळ’ या क्रीडा मंत्रालयाच्या संकल्पनेचा मुंबई हॉकीला किती फटका बसणार आहे?

मुंबई हॉकी असोसिएशनची स्थापना ८६ वर्षांपूर्वी करण्यात आली असून भारतीय हॉकी असोसिएशनचे आम्ही संस्थापक सदस्य आहोत. हॉकी इंडियाला १२ वर्षांपूर्वी क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली. त्यानंतर अलीकडेच त्यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ या तीन असोसिएशनपैकी महाराष्ट्र हॉकी संघटनेला पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा दिला. सर्वात जुनी आणि मोठी संघटना असलेल्या मुंबईला संलग्न सदस्यत्व देण्यात आले आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवला असून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा मंत्रालय आणि हॉकी इंडियाला पत्र पाठवून राष्ट्रीय स्पर्धामध्ये मुंबईचा संघ पाठवण्याची मागणी केली आहे. पण नव्या नियमांमुळे महाराष्ट्राचा एकच संघ राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार असून त्यामुळे मुंबईच्या मोजक्या खेळाडूंना संधी मिळणार आहे.

* नव्या नियमांमुळे खेळाडूंचे किती नुकसान होणार आहे?

मुंबईतील खेळाडूंना याचा मोठा फटका बसणार आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची संधी हिरावली जाणार आहे. १६ जणांच्या महाराष्ट्र संघात अन्य शहरांना न्याय देण्याच्या उद्देशाने मुंबईतील फक्त सात-आठ खेळाडूंनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंना आपले कर्तृत्व दाखवण्याची मोजकी संधी मिळणार आहे. टाटा, महिंद्रा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, आयकर, आरसीएफसारख्या कंपन्यांनी आपले संघ कमी केले असून खेळाडूंची नोकऱ्यांची संधी हिरावली जाणार आहे. नोकऱ्या कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालयांमधील हॉकी खेळाची आवड कमी होईल. ८० ते ९०च्या दशकापर्यंत भारतीय संघात मुंबईचे किमान ५-६ खेळाडू असायचे. पण यापुढे राष्ट्रीय स्तरावरील मुंबईची संख्या कमी झाल्यामुळे मोठा फटका बसणार आहे. परिणामी मुंबईतील हॉकी रसातळाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* लोढा समितीच्या शिफारशींविषयी आपले मत काय आहे?

लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी चांगल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या शिफारशींचे पालन करून ‘एक राज्य, एक मत’ याविषयी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. छोटय़ा शहरांमधील गुणवत्ता पुढे येण्याचे मान्य करत सर्वोच्च न्यायालयानेही रणजी करंडकसारख्या राष्ट्रीय स्पर्धेत एकाच राज्याचे अनेक संघ (उदा. महाराष्ट्रातील मुंबई, विदर्भ आणि महाराष्ट्र तसेच गुजरातमधील बडोदा, सौराष्ट्र आणि गुजरात) खेळवण्याची परवानगी दिली आहे. याच नियमाप्रमाणे मुंबईच्या संघाला राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. पण मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडची कार्यकारिणी समिती हॉकी इंडिया आणि महाराष्ट्र हॉकी संघटना नाराज होईल म्हणून न्यायालयात जाण्यास तयार नाही. मात्र हॉकीपटू या नात्याने आम्ही त्याविरोधात आवाज उठवला असून संबंधितांकडे पत्राद्वारे तशी मागणी आम्ही केली आहे.

* करोनानंतर मुंबईतील हॉकी खेळाची गाडी कधी रुळावर येईल, असे तुम्हाला वाटते?

खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षितता, सामाजिक अंतराचे भान याला प्रथम प्राधान्य द्यायला हवे. राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी आशा आहे. पण करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे सध्या घाई करण्याची कोणतीही गरज नाही. २०२१ पासून सर्व स्पर्धा सुरू होतील, असे मला वाटते. पण सध्या धोका पत्करण्याची गरज नाही.

* टोक्यो ऑलिम्पिक लांबणीवर पडल्यामुळे भारतीय हॉकी संघाच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला असेल?

चांगली कामगिरी करत असताना ऑलिम्पिकसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा लांबणीवर पडल्याने खेळाडूंच्या मानसिकतेवर नक्कीच परिणाम झाला असेल. पण सर्व संघांसाठी ही समान बाब आहे. सर्व संघांना तडजोड करून नव्याने आखणी करावी लागणार आहे. प्रो-हॉकी लीगमध्ये भारताची कामगिरी चांगली होत होती. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलॅण्ड्ससारख्या बलाढय़ संघांना भारताने तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास गगनाला पोहोचला होता. आता पुढील वर्षांचे योग्य नियोजन करताना सराव सत्रांमध्ये सामन्यादरम्यानची वातावरणनिर्मिती तयार करण्याचा तसेच आपला दर्जा उंचावण्याचा प्रयत्न भारतीय संघाला करावा लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 1:39 am

Web Title: m m somaiya former olympian hockey player interview zws 70
Next Stories
1 स्टिरिया ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत : हॅमिल्टनला पहिले विजेतेपद
2 पहिला मान पाहुण्यांचा! वेस्ट इंडिजचा यजमान इंग्लंडवर विजय
3 Video : आर्चरचा स्विंग अन् ब्रेथवेटची झाली दांडी गुल
Just Now!
X