बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधील सामना खऱ्या अर्थाने हाय व्होल्टेज ड्रामा ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना बंगळुरुने एका धावेने जिंकला. पण या सामन्याचा खरा हिरो ठरला तो चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी. धोनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला तरी त्याच्या तुफानी खेळीने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या खेळीदरम्यान धोनीने काही विक्रम आपल्या नावावर केले.

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकाकी झुंज देत ५ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करत ४८ चेंडूत ८४ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने केलेले विक्रम खालील प्रमाणे

> १
कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये चार हजार धावांचा टप्पा ओलांडणारा पहिलाच खेळाडू

> २
८४ धावांवर धोनी नाबाद राहिला. धोनीची ही आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. या आधी त्याने मागील वर्षी पंजाब विरुद्ध खेळताना ७९ धावा केल्या होत्या.

> ३
आयपीएलमध्ये २०० हून अधिक षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. धोनीने एकूम २०३ षटकार मारले असून या यादीमध्ये धोनीच्या पुढे केवळ क्रिस गेस (३२३) आणि ए.बी. डिव्हिलियर्स (२०४) हेच खेळाडू आहेत.

> ४
आयपीएलच्या शेवटच्या षटकामध्ये सर्वाधिक वेळा २० हून अधिक धावा करणारा खेळाडू

> ५
धोनीने शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मारलेला षटकार मैदानाच्या बाहेर गेला. १११ मीटर लांबीचा हा षटका या हंगामीतील सर्वात मोठा षटकार ठरला आहे.

> ६
यंदाच्या हंगामात शेवटच्या षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा धोनी दुसरा खेळाडू ठरला

> ७
धावांचा पाठलाग करताना पराभूत होऊनही सर्वोच्च धावसंख्या
४८ चेंडूत नाबाद ८४ धावा करुनही धोनी संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. धोनीने अशाप्रकारे झुंजार खेळी करुनही पराभव होण्याची ही चौथी वेळ आहे. या आधी २०१३ मध्ये कोलकात्यातील सामन्यात मुंबईविरुद्ध खेळताना ४५ चेंडूत नाबाद ६३ धावा, मुंबईमध्ये २०१४ साली पंजाबविरुद्ध खेळताना ३१ चेंडूत नाबाद ४२ धावा आणि २०१८ साली मोहालीमध्ये पंजाबविरुद्ध खेळताना ४४ चेंडूत नाबाद ७९ धावा करुनही धोनीला संघाला विजय मिळवून देता आला नव्हता.