‘बीसीसीआय’ची क्रिकेट सल्लागार समिती जाहीर

नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू मदनलाल, रुद्र प्रताप सिंग आणि सुलक्षणा नायक यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे.

राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि सदस्य गगन खोडा यांच्या जागी दोन नवे सदस्य नेमण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीचा कार्यकाळ एक वर्षांचा असेल, असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे.

देशाच्या विविध संघांचे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारीसुद्धा क्रिकेट सल्लागार समितीकडेच असते. गतवर्षी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांनी हितसंबंधांचे आरोप झाल्यामुळे क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा दिला होता.

मदनलाल

३९ कसोटी आणि ६७ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव. १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य. भारताचे माजी प्रशिक्षक तसेच वरिष्ठ गटाच्या निवड समितीचे माजी सदस्य.

आर. पी. सिंग

१४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव. २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या संघाचा सदस्य.

सुलक्षणा नायक

भारताचे ११ वर्षे प्रतिनिधित्व करताना २ कसोटी, ४६ एकदिवसीय आणि ३१ ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव.