मध्यप्रदेश संघातील वेगवान गोलंदाज रवी यादवने आपल्या क्रिकेट करिअरच्या पहिल्याच षटकात हॅटट्रिक करण्याचा विक्रम केला आहे. त्याने रणजी सामन्यात उत्तर प्रदेश विरोधात खेळताना सामन्याच्या पहिल्याच षटकात करिअरचे पहिले षटक टाकताना पहिल्या तीन चेंडूंवर तीन विकेट्स घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.

रवीने उत्तर प्रदेश संघातील आर्यन जोयल, अंकित राजपूत आणि समीर रिझवीला लागोपाठ तीन चेंडूंवर बाद केले. त्याच्या या अनोख्या विक्रमाचा व्हिडीओ BCCI ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

कोण आहे रवी यादव?

२८ वर्षीय रवी मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. या डावखुऱ्या गोलंदाजाने युपीमधूनच आपल्या क्रिकेट कारकिर्दिची सुरुवात केली होती. परंतु नंतर तो काही तांत्रिक अडचणींमुळे मध्यप्रदेश येथे क्रिकेट खेळू लागला. आणि गंमतीशीर बाब म्हणजे ज्या संघासाठी खेळण्याची स्वप्ने रवी पाहात होता त्या उत्तर प्रदेशच्या संघाविरोधातच त्याने आपली क्रिकेट कारकिर्द सुरु केली.