जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. जोकोव्हिचने इंग्लंडच्या अँडी मरे याचा ६-२, ३-६, ६-३ असा पराभव केला.
जोकोव्हिचने या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासूनच धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. शेवटच्या फेरीतही आपला उंचावलेला खेळ कायम राखत जोकोव्हिचने विजेतेपदावर नाव कोरले. माद्रिद ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर स्पेनच्या राफेल नदाल याला मागे टाकत एकूण ‘२९ एटीपी मास्टर्स’ विजेतेपदं पटकावली आहेत.
दरम्यान, यंदाच्या वर्षी जोकोव्हिचने आतापर्यंत एकूण पाच स्पर्धेची विजेतेपदं आपल्या नावावर केली आहेत, तर अँडी मरे याला पराभवामुळे आपले जागतिक क्रमवारीतील दुसरे स्थान गमवावे लागले आहे. त्याच्या जागी आता रॉजर फेडरर दुसऱया स्थानावर आला आहे.