कल्पक चाली व उत्कृष्ट व्यूहरचना करत मॅग्नस कार्लसनने अखेर विश्वविजेता विश्वनाथन आनंदवर पाचव्या डावात मात करत बरोबरीची कोंडी फोडली. कार्लसनने अचूक चाली करत आनंदच्या चुकांचा फायदा उठवत साडेपाच तास रंगलेल्या या लढतीत आनंदवर ५८व्या चालीला विजय मिळवून विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीत ३-२ अशी आघाडी घेतली.
पाचव्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांच्या साहाय्याने खेळताना कार्लसनने इंग्लिश पद्धतीनुसार डावाची सुरुवात केली. आनंदने राजाच्या समोरील प्यादे तिसऱ्या घरात टाकत कार्लसनला उत्तर दिले. तिसऱ्या चालीला आनंदला प्रतिस्पध्र्याचे प्यादे घेण्याची संधी मिळाली होती मात्र त्याने या संधीचा लाभ घेतला नाही.
कार्लसनने आपला राजा सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने १२व्या चालीला कॅसलिंग केले. १५व्या चालीला दोघांनीही आपल्या वजिरांचा बळी दिला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे मोहरे घेत डावात आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न केला. डावाच्या मध्यात कार्लसनने वर्चस्व मिळविण्यासाठी काही चांगल्या चाली केल्या. आनंदनेही त्याला समर्पक उत्तर दिले. ३८व्या चालीला दोन्ही खेळाडूंकडे प्रत्येकी दोन हत्ती, एक उंट व पाच प्यादी अशी स्थिती होती. चौथ्या डावाप्रमाणेच हा डावही रंगतदार स्थितीनंतर बरोबरीकडे झुकणार, असे वाटत होते. मात्र ४२व्या चालीला कार्लसनने एका प्याद्याची आघाडी घेतली. ४६व्या चालीला आनंदने आपला दुसरा हत्ती कार्लसनच्या प्याद्यामागे नेण्याऐवजी शह दिला. ५०व्या चालीला कार्लसनकडे एका प्याद्याची आघाडी कायम होती. हीच आघाडी त्याच्यासाठी निर्णायक ठरली. कार्लसनच्या एका प्याद्याचे वजिरात रूपांतर होणे, अटळ आहे हे लक्षात येताच आनंदने ५८व्या चालीला पराभव मान्य केला.