भारताच्या विश्वनाथन आनंदने जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पाच फेऱ्यांमध्ये चार गुण कमवून दमदार कामगिरी नोंदवली; परंतु त्याला पदकापासून वंचित राहावे लागले.

विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विजेतेपद राखले. त्याने १५ डावांच्या या स्पर्धेत ११.५ गुणांची कमाई केली. त्यामध्ये त्याने आठ डाव जिंकले व सात डावांमध्ये बरोबरी स्वीकारली. त्याने एकही डाव गमावला नाही व आपला अव्वल दर्जा सिद्ध केला. इयान नेपोम्नियाची (रशिया), तैमूर राजदाबोव्ह (अझरबैजान) व लिनिअर दोमिंग्वेझ (क्युबा) यांचे प्रत्येकी १०.५ गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दोन ते चार क्रमांक देण्यात आले.

आनंदने ९.५ गुणांची कमाई केली. पहिल्या दहा डावांमध्ये त्याला जेमतेम ५.५ गुण मिळाले होते. शेवटच्या दिवशी त्याने बातरेझ सोको, मॅच्युअस बार्तेल (पोलंड), तिग्रान पेट्रोशियान (अर्मेनिया) यांच्यावर शानदार विजय मिळविला. तसेच त्याने रशियाचा इदार खैरुलीन व युक्रेनच्या युरियू क्रिवोरुचेन्को यांच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. त्याला १३वे स्थान मिळाले.

भारताचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्राचा खेळाडू विदित गुजराथीने नऊ गुण मिळवताना आंतरराष्ट्रीय मानांकनात १०५ गुणांचीही कमाई केली. त्याने आनंदखालोखाल स्थान मिळवले. त्याने शेवटच्या दिवशी अ‍ॅलेक्झांडर मोरोजेविच, झोल्टान अल्मासी व पाव्हेल एलियानोव यांच्यावर सनसनाटी विजय मिळवला. या अनपेक्षित विजयापाठोपाठ त्याने लिव्हॉन आरोनियन या बलाढय़ खेळाडूला बरोबरीत रोखून बुद्धिबळ पंडितांना चकित करून टाकले.

भारताच्याच बी. अधिबाननेही नऊ गुणांची कमाई केली. त्याने रशियाच्या दिमित्री आंद्रेकिन याच्यावर खळबळजनक विजय मिळवला. पाठोपाठ त्याने बोरिस गेल्फंडला बरोबरीत रोखून अनपेक्षित कामगिरी केली. कृष्णन शशिकिरण (८ गुण), एस.पी. सेतुरामन (७.५), सूर्यशेखर गांगुली (७) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.