मॅग्नस कार्लसनला दहा कोटी रुपयांचे इनाम
भारताच्या विश्वनाथन आनंदवर मात करून विश्वविजेतेपदावर नाव कोरणारा नॉर्वेचा नवा जगज्जेता मॅग्नस कार्लसनचा सोमवारी सत्कार करण्यात आला. १० दिवस रंगलेल्या या स्पर्धेनंतर कार्लसनला ९.९० कोटी रुपयांचे इनाम देण्यात आले.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या हस्ते त्याला पुरस्काराची रक्कम आणि विश्वविजेतेपदाचा करंडक देण्यात आला. १० मिनिटे रंगलेल्या या कार्यक्रमात विश्वनाथन आनंदलाही गौरवण्यात आले.
विश्वविजेतेपद पटकावणार गॅरी कास्पारोव्ह यांच्यानंतरचा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरलेल्या कार्लसनला सोन्याने मढवलेला करंडक, सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या आनंदला विश्वविजेतेपदाच्या लढतीत कार्लसनकडून ३.५-६.५ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. आनंदला चांदीचा करंडक, ६.०३ कोटी रुपये आणि रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) अध्यक्ष किरसान इयूमझिनोव्ह यांनी कार्लसन आणि आनंदला पदक देऊन गौरवले.