भारताच्या विश्वनाथन आनंदने इटलीचा तुल्यबळ खेळाडू फॅबिआनो कारुआनाला बरोबरीत रोखले आणि शामकीर चषक बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने या स्पध्रेतही अजिंक्यपद मिळवले.
दहा खेळाडूंच्या या स्पर्धेत कार्लसनने सात गुण मिळविले. त्याने शेवटच्या फेरीत स्थानिक खेळाडू रौफ मामेदोव्हवर शानदार विजय मिळविला. आनंदने सहा गुणांची कमाई केली. कारुआना व अमेरिकेचा वेसली सो यांचे प्रत्येकी पाच गुण झाले.
कारुआनाविरुद्ध शेवटच्या फेरीत आनंदला काळ्या मोहरांनी खेळायचे होते. त्यामुळेच त्याने फारसा धोका न पत्करता कल्पक चालीने उत्तर देण्यावर भर दिला. डावाच्या मध्यास त्यांनी एकमेकांचे वजीर घेतले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी विजयासाठी योग्य व्यूहरचना करण्याचा प्रयत्न केला, मात्र डावातील गुंतागुंत वाढल्यामुळे त्यांनी ३६व्या चालीस बरोबरी मान्य केली.