विश्वनाथन आनंदला नववे स्थान
विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने बुद्धिबळाच्या जागतिक स्तरावर आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. त्याने येथील क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदावर आपली मोहोर उमटविली. भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदला नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत कार्लसनने साडेपाच गुण मिळविले. त्याने शेवटच्या फेरीत अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुकवर मात केली, पण त्यानंतर कार्लसन यांच्यासह व्हॅचियर लाग्रेव्ह व अनिष गिरी यांचेही तेवढेच गुण झाले. मात्र प्रगत गुणांच्या आधारे कार्लसनला विजेतेपद बहाल करण्यात आले. गिरीला उपविजेतेपद मिळाले, तर लाग्रेव्हला तिसरा क्रमांक मिळाला. बुद्धिबळ मालिकांमध्येही त्याने सर्वोच्च स्थान मिळविले.
आनंदने नऊ फे ऱ्यांमध्ये साडेतीन गुण मिळविले. त्याने एक डावजिंकला तर तीन डावांमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. पाच डावांमध्ये त्याला बरोबरीस सामोरे जावे लागले. त्याने शेवटच्या फेरीत अनिष गिरीला बरोबरीत रोखले. मालिकेत त्याला आठवे स्थान मिळाले. गिरीला मालिकेतही दुसरे स्थान मिळाले. लाग्रेव्हने शेवटच्या फेरीत लिवॉन आरोनियन याच्याशी बरोबरी साधली.
गिरी याच्याविरुद्ध आनंद याला चांगल्या व्यूहरचनेसाठी योग्य संधी मिळाली नाही. गिरीकडे कार्लसनपेक्षा अध्र्या गुणाची आघाडी असल्यामुळे त्याने आनंदविरुद्ध भक्कम बचावतंत्राचाच उपयोग केला. त्यामुळे आनंदला बरोबरीखेरीज अन्य कोणताही पर्याय नव्हता.