अलिबागमधील आरसीएफ क्रीडा संकुलच्या मदानावर सुरू असलेल्या महाकबड्डी लीग स्पध्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या तिसऱ्या दिवशी महिला विभागात बारामती हरिकेन्स संघाने सांगली रॉयल्सवर ३८-३६ असा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. पुरुष विभागात रायगड डायनामोज संघानेही अहमदनगर चॅलेंजर संघावर ३८-२९ असा विजय मिळवून बाद फेरी गाठली.
 महिला विभागातील सामन्यात सहाव्या मिनिटाला सांगली रॉयल्सने पूजा शेलार व सायली कचरे यांच्या दमदार चढायांच्या जारोवर बारामती हरिकेन्सवर लोण लावत आघाडी घेतली. मात्र त्यांना ही आघाडी फार काळ टिकवता आली नाही. हरिकेन्सने रॉयल्सवर लोण चढवत सामन्यात चुरस निर्माण करताना २०-२० अशी बरोबरी साधली आणि पुढच्याच चढाईत पूजाची पकड करत मध्यंतराला २१-२० अशा एका गुणाची आघाडी घेतली. मध्यंतरानंतर हरिकेन्सने आपली आघाडी वाढवत विजय निश्चित केला. हरिकेन्सची कर्णधार नेहा घाडगेने ६ गुण २ बोनस गुणांसह ८ गुण, स्नेहल िशदेने ५ गुण २ बोनस गुणांसह ७ गुण मिळविले. त्यांना पायल गवारेने ९ पकडी घेऊन आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.  
पुरुषांच्या ‘अ’ गटात रायगड डायनामोजने ३८-२९ अशा फरकाने अहमदनगर चॅलेंजरवर विजय मिळवला. डायनामोजच्या आशीष म्हात्रे एकूण ४ गुण, आरिफ शेख याने ३ पकडी घेत डायनामोजला मध्यंतराला १९-११ अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावाच्या १०व्या मिनिटाला डायनामोजने नगर चॅलेंजरवर लोण लावत सामन्यावर आघाडी घेतली. राजेंद्र देशमुखने ११ गुण व २ बोनससह १३ गुण, आशीष म्हात्रेने एकूण ९ गुण, सुलतान डांगेने एकूण ६ गुण मिळविले. त्यांना आरिफ सय्यदने ४ पकडी घेत चांगली साथ दिली.