महाक बड्डी लीग स्पर्धेत ठाणे संघाने पुरुष तसेच महिला गटात उपांत्य फेरीत आगेकूच केली. महिलांमध्ये ठाण्यासमोर रत्नागिरीचे आव्हान असणार आहे तर बारामती हरिकेन्स आणि मुंबई डेव्हिल्स आमनेसामने असणार आहेत. पुरुषांमध्ये सांगली रॉयल्स आणि रायगड डायनामोज तर बारामती हरिकेन्स आणि ठाणे टायगर्स यांच्यात लढत रंगणार आहे.
अलिबाग येथील आरसीएफ क्रीडा संकुल येथे मॅक्स गॉडवीट आयोजित तिसऱ्या टप्प्याच्या लढतीनंतर उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महिलांच्या लढतीत नगर चॅलेंजर्स संघाने रायगड डायनामोज संघावर ३५-३० असा विजय मिळवला. सरासरी गुणांमध्ये पिछाडीवर असल्याने दोन्ही संघांचे स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले. अंकिता जगताप, क्षितिजा हिरवे, कोमल देवकर, नेहा कदम यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर नगरने हा विजय मिळवला.
पुरुषांमध्ये सांगली रॉयल्स संघाने बारामती हरिकेन्स संघावर तब्बल तीन लोण चढवत ४६-३७ असा शानदार विजय मिळवला. मध्यंतराला सांगली रॉयल्सकडे २२-२१ अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. रॉयल्सच्या भागेस भिसेने १२ गुण मिळवत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. आनंद पाटीलने १५ गुणांची कमाई करत त्याला चांगली साथ दिली. कृष्णा मदनेने ७ पकडी करत या दोघांना चांगली साथ दिली. बारामतीकडून योगेश मोरे, रोहित ठेंगे यांनी शानदार खेळ केला.