राज्य कबड्डी असोसिएशनचा निर्वाणीचा इशारा
महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या तारखा १५ जुलैपर्यंत घोषित कराव्यात, अन्यथा संघटनेला याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने संयोजक कंपनीला दिला आहे.
महाकबड्डीच्या दुसऱ्या हंगामासाठी याआधी तारखा आणि संघमालकांची निश्चिती झाली होती. मात्र काही कारणास्तव ही स्पर्धा नियोजित कार्यक्रमानुसार पार पडू शकली नव्हती. मात्र आता नुकत्याच झालेल्या राज्य कबड्डी असोसिएशनच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली.
जर संयोजक कंपनी दिलेल्या मुदतीत स्पर्धा घेऊ शकली नाही, तर संघटना याबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकेल, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले, अशी माहिती राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी दिली.

सरकार्यवाहपदासाठी मोर्चेबांधणी सुरू
राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रभारी सरकार्यवाह संभाजी पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी २६ जूनला पोटनिवडणूक होणार असून, या प्रतिष्ठेच्या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र सध्याच्या कार्यकारिणी समितीमधील कोणत्याही पदाधिकाऱ्याला ही निवडणूक लढवायची असल्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांनी सावध पवित्रा घेतला आहे. पण परिणामी या रिक्त झालेल्या सर्वच जागांसाठी निवडणूक होणार आहे. माजी सरकार्यवाह रमेश देवाडीकर, शांताराम जाधव, सुनील जाधव, बाबुराव चांदोरे, मुझफ्फर हुसैन आणि शशिकांत ठाकूर या नावांची सरकार्यवाह पदासाठी जोरदार चर्चा असली, तरी पदावरील व्यक्तींना ही जोखीम असल्यामुळे हे चित्र स्पष्ट व्हायला उशीर होणार आहे.या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख १५ जून आणि माघार घेण्याची १७ जून असली, तरी पदाधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपला राजीनामा देण्याची मुदत १० जूनपर्यंत आहे. यानंतर १८ जूनला अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होईल. या निवडणुकीची मतमोजणी २६ जूनला दुपारी होणार असून, त्यानंतर निकाल स्पष्ट होईल आणि विशेष सर्वसाधारण सभासुद्धा याच दिवशी होणार आहे.