महाकबड्डी लीगमध्ये पहिल्या दिवशीचाच कित्ता दुसऱ्या दिवशी गिरवण्यात आला. बारामती हरिकेनने पुरुषांमध्ये आणि ठाणे टायगर्सने महिलांमध्ये सामना जिंकून शानदार सलामी नोंदवली. शनिवारी दोन्ही सामने अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार झाले. पुरुषांमधील सामना नियोजित वेळेत ४२-४२ असा बरोबरीत सुटला. परंतु रोहित पार्टेने सुवर्णचढाईमध्ये दोन गुण मिळवल्यामुळे बारामतीने पुणे पँथर्सवर मात केली. महिलांमध्ये मुंबई डेव्हिल्सने पहिल्या डावात आघाडी घेतली होती, पण ठाणे टायगर्सने दुसऱ्या सत्रात जोरदार मुसंडी मारून ४२-३९ अशा फरकाने विजय मिळवला.
वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिर संकुलात चालू असलेल्या या स्पध्रेत पुरुष विभागात बारामती हरिकेनने पहिल्या सत्रात २०-१५ अशी आघाडी घेताना पुण्यावर एक लोण चढवला होता. परंतु दुसऱ्या सत्रात पुण्याने लोण परतवून २४-२३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा बारामतीने लोण देत ३०-२६ अशी आघाडी घेतली. मात्र पुन्हा पुण्याने डोके वर काढून आपली आघाडी वाढवली. मात्र मोबीन शेखने अखेरच्या चढाईत २ गुण घेतल्याने सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुवर्णचढाईत बारामतीच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या सामनावीर पार्टेने चढाईत एकंदर १२ गुण घेतले. त्याला ११ गुण मिळवणाऱ्या मोबीनने सुरेख साथ दिली. तर अमित जामधाडेने उत्तम खेळ केला. पुण्याकडून सचिन पाटीलने (१३ गुण) कौशल्यपूर्ण चढायांनी कबड्डीरसिकांची मने जिंकली.
महिलांमध्ये प्रारंभी ठाण्याची स्नेहल शिंदे आणि मुंबईची सायली केरिपाळे या पुणेकर खेळाडूंच्या चढायांनी रंगत आणली. मात्र पहिल्या सत्राच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये सायलीची दोनदा पकड झाली आणि दुसऱ्या सत्रात प्रारंभी तिसरी पकड झाली. या तीन पकडींनंतर मात्र सायली आपला प्रभाव पाडू शकली नाही. मुंबईने मध्यंतराला २३-२१ अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात ठाण्याकडून स्नेहल आणि आम्रपाली गलांडे तर मुंबईकडून सायली आणि सोनाली शिंगटे असे दुहेरी आक्रमण सुरू होते. दुसऱ्या सत्राच्या दुसऱ्या मिनिटालाच ठाण्याने पहिला तर सातव्या मिनिटाला दुसरा लोण चढवला. दुसऱ्या सत्रात उंच सोनालीने सामना वाचवण्यासाठी दमदार चढाया केल्या. सामनावीर स्नेहलने चढायांचे १४ आणि आम्रपालीने ११ गुण मिळवले. तर मुंबईकडून सायलीने चढायांचे १४ तर सोनालीने १३ गुणांची कमाई केली.
मुंबई संघातील सायली केरिपाळे आम्हाला आव्हानात्मक ठरणार याची कल्पना होती. परंतु आम्ही एकाच संघाकडून खेळत असल्यामुळे तिचे कच्चे दुवे माहीत होते. सुरुवातीला आमचे क्षेत्ररक्षण प्रभाव पाडण्यात अपयशी ठरत होते. मात्र कालांतराने ते छान जुळून आले आणि सायलीच्या तीन पकडी झाल्या. विजयी सलामी नोंदवल्याचा अतिशय आनंद होत आहे.         -स्नेहल शिंदे   (ठाणे टायगर्सची कर्णधार)

रोहित पार्टेने निर्णायक सुवर्ण चढाईत गुण मिळवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. छाया : दिलीप कागडा