महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी निश्चित करण्यात आलेला १२ जानेवारीचा मुहूर्त चुकण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या थकबाकीमुळे कबड्डी क्षेत्रात पसरलेला असंतोष आणि त्या अनुषंगाने संयोजनात आलेल्या ढिलाईमुळे जानेवारीत महाकबड्डी लीग होणे कठीण आहे. पुण्यात ७ जानेवारीला होणाऱ्या महाकबड्डी लीगच्या संयोजन समितीच्या बैठकीत तारखांबाबत निर्णय होऊ शकेल. मात्र ही स्पर्धा फेब्रुवारीत होण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची महाकबड्डी लीगसंदर्भातील संयोजन समिती आणि गॉडविट कंपनी यांनी दुसऱ्या महाकबड्डी लीगच्या हंगामासाठी याआधी १२ ते २९ जानेवारी अशा तारखा निश्चित केल्या होत्या. कोल्हापूर आणि ठाणे या दोन ठिकाणी हे सामने आयोजित करण्याचे प्रयोजन होते. मात्र खेळाडूंचे पहिल्या हंगामाचे मानधन दिल्याशिवाय महाकबड्डीला मान्यता देणार नाही, असा इशारा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी दिला होता.
त्यानंतर कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रभारी सचिव संभाजी पाटील यांनी त्याला दुजोरा दिला
होता. आष्टीला दोन महिन्यांपूर्वी झालेल्या संघटनेच्या शासकीय सभेतसुद्धा खेळाडूंचे मानधन महत्त्वाचे असल्याची भूमिका सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.
जानेवारी महिन्यात अनेक महत्त्वाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा असल्यामुळे स्पर्धा संयोजकांनी महाकबड्डी पुढे ढकलण्याची विनंती राज्य कबड्डी असोसिएशनला केली होती. कारण या स्पर्धानाही राज्य संघटनेनेच मान्यता दिली होती. परंतु खेळाडूंचे मानधन हा मुद्दा मात्र ऐरणीवर होता. हे पैसे दिल्याशिवाय महाकबड्डी होऊ नये, अशी संघटनेतील बहुतांशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. आता पुण्यात होणाऱ्या विशेष बैठकीत महाकबड्डीची संयोजन समिती आणि सर्व संघमालक यांच्यात चर्चा होऊन आगामी धोरण ठरवण्यात येईल. याचप्रमाणे दुसऱ्या हंगामातील तारखा निश्चित करण्यात येतील.

आधी चौकशी अहवालावर चर्चा करण्याची मागणी
आष्टीला झालेल्या शासकीय सभेत खेळाडूंचे पैसे दिल्याशिवाय महाकबड्डीचा दुसरा हंगाम घेण्यात येऊ नये असे ठरवण्यात आले होते. याच बैठकीत पहिल्या हंगामाची चौकशी करण्यासाठी प्रताप शिंदे, विजय पाथ्रीकर आणि आस्वाद पाटील यांची त्रिसदस्यीय चौकशी नेमली होती. या अहवालावर अध्यक्ष किशोर पाटील यांनी शासकीय सभा घेऊन चर्चा करावी. त्यानंतरच पुढील हंगामाकडे गांभीर्याने पाहता येईल, असे प्रताप शिंदे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्था पुरवणाऱ्या व्यक्तींच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. आम्ही त्या सर्व गोष्टींची शहानिशा करून आपला अहवाल राज्य कबड्डी असोसिएशनकडे सादर केला आहे. त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.’’