क्षणाक्षणाला रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात ठाणे टायगर्स संघाने पहिल्या महाकबड्डी लीगमधील विजेतेपदाला गवसणी घातली. त्यांनी बारामती हरिकेन्स संघावर ३४-३२ अशी केवळ दोन गुणांनी मात केली.
महिलांच्या लढतीत ठाणे संघाने स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली ३-० अशी झकास सुरुवात केली, मात्र बारामती संघाच्या नेहा घाडगेने दोन गुण टिपून प्रारंभीपासून सामन्यातील चुरस कायम राखली. पाचव्या मिनिटाला ठाण्याने ७-६ अशी आघाडी मिळवली होती. एकीकडे स्नेहल शिंदे व अंकिता मोहोळ यांच्या जोरदार चढाया तर सोनाली इंगळेने केलेल्या पकडीच्या जोरावर ठाणे संघाने आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. बारामती संघाच्या नेहा घाडगेच्या चौफेर खेळाच्या जोरावर त्यांना चांगली लढत दिली. मात्र मध्यंतराला दीड मिनिटे बाकी असताना स्नेहलने दोन गुण मिळवले. त्यामुळे पूर्वार्धात ठाणे संघाने १३-१० अशी आघाडी मिळविली.
उत्तरार्धात ठाणे संघाने सुरुवातीलाच लोण नोंदवला. उत्तरार्धात मोनिका शिंदेला बारामती संघाने संधी दिली. तिने केलेल्या लागोपाठ तीन यशस्वी चढाया तसेच रिबेका गवारेने केलेल्या पकडींच्या जोरावर बारामती संघाने लोण परतवत सामन्यात उत्कंठा निर्माण केली. हा लोण स्वीकारल्यानंतर ठाणे संघाने स्नेहलच्या खोलवर चढायांमुळे पुन्हा दोन ते तीन गुणांची आघाडी कायम ठेवली.
या सामन्यात स्नेहल शिंदे हिने १२ चढायांमध्ये १७ गुण मिळविले तर सोनाली इंगळे हिने पाच पकडी केल्या तसेच दोन बोनस गुणांची कमाई केली. बारामती संघाच्या नेहा घाडगे हिने काल झालेल्या दुखापतीचा लवलेश न दाखविता सुरेख खेळ केला. तिने पाच बोनस गुणांसह अकरा गुण मिळविले.

विजेतेपदाची खात्री होती -स्नेहल
विजेतेपद मिळविण्याची खात्री होती मात्र बारामती संघाने चांगली लढत सामना रंगतदार केला. नेहा घाडगे हिने चांगला खेळ केला मात्र त्याचे दडपण आमच्यावर नव्हते. आम्ही नियोजनबद्ध खेळ केला, त्यामुळेच विजयी झालो असे ठाणे संघाची कर्णधार स्नेहल शिंदे हिने सांगितले. विजयाचे श्रेय संघातील सर्व सहकारी आणि संघाचे प्रशिक्षक मालोजी भोसले यांना दिले.