महाकबड्डी लीग कोल्हापूर आणि ठाण्यात होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर आणि गॉडविट कंपनीने केली आहे; परंतु यजमान करवीरनगरीचे पदाधिकारी मात्र अंधारात आहेत. महाकबड्डी लीगचे दुसरे पर्व घोषित करताना असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव यांना विश्वासात न घेता परस्पर कोल्हापूर व ठाणे येथे स्पर्धा होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. मी राज्याबरोबरच जिल्हा कबड्डी असोसिएशनचा सचिव असल्याने कोल्हापूरमध्ये स्पर्धा होणार असल्याची कल्पना देण्याचे सौजन्यही संयोजकांनी दाखवलेले नाही, असे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रभारी सरकार्यवाह संभाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘‘महाकबड्डी लीगच्या पहिल्या पर्वातील खेळाडूंचे सुमारे ४८ लाख रुपये मानधन आणि संघमालकांची २४ लाखांची बक्षीस रक्कम अद्याप मिळालेली नाही. यास कारणीभूत असणाऱ्या गॉडविट कंपनीशी तीनदा पत्रव्यवहार करूनही कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही,’’ असा आरोप पाटील यांनी केला आहे.

‘‘महाकबड्डी लीगचा दुसरा हंगाम अधिकृतरीत्या घोषित केला आहे. असोसिएशनला विचारात न घेता गॉडविट कंपनीने परस्पर हा निर्णय घेतला आहे,’’ असे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून महाकबड्डी लीग स्पर्धा सुरू करण्यात आली. पहिल्या पर्वात चार ठिकाणी स्पर्धा पार पडल्या. दुसरे पर्व सुरू करण्याची घोषणा प्रायोजक गॉडविट कंपनीने केली असून ही स्पर्धा कोल्हापूर ठाणे येथे खेळवण्यात येणार आहे. मात्र कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सचिव संभाजी पाटील, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य प्रा. अण्णासाहेब गावडे, दत्तात्रय खराडे, अजित पाटील, शेखर शहा, दीपक पाटील, राजेंद्र बनसोडे, नामदेव गावडे, एस. एस. चौगुले आदींनी गॉडविट कंपनीच्या मनमानी कारभारावर टीकास्त्र सोडले.

‘‘राज्य कबड्डी असोसिएशनने आपल्या स्पध्रेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. आमदार-खासदार हे संयोजक असलेल्या स्पर्धा राज्यात जानेवारीत होत असून या स्पर्धाना लेखी मान्यता देण्यात आली असल्याने त्यामध्ये बदल होणार नाही. महाकबड्डी लीग सुरळीत पार पडायच्या असतील तर गॉडविट कंपनीला आमच्या असोसिएशनच्या सोयीनुसार वेळापत्रकात बदल करावा लागेल. असोसिएशनच्या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्यांबाबत गंभीर विचार केला जाणार आहे.’’

संभाजी पाटील, राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह