महाराष्ट्राने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये महिला व कनिष्ठ मुली या दोन्ही विभागात सांघिक विजेतेपद मिळविले आणि ५८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दुहेरी कामगिरी केली. केरळच्या एलिझाबेथ कोशी हिने महिलांच्या वैयक्तिक विभागात सोनेरी यश मिळविले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत तेजस्विनी सावंत, अंजली भागवत व वेदांगी तुळजापूरकर यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने १७१४ गुणांसह महिलांचे विजेतेपद मिळविले. रेल्वे व सीमा सुरक्षा दल यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. कनिष्ठ मुलींच्या गटात महाराष्ट्राने १६६४ गुणांसह अजिंक्यपद मिळविले. त्या वेळी महाराष्ट्र संघात प्रियल केणी, याशिका शिंदे व श्यामलाकुमारी यांचा समावेश होता. तामिळनाडू व पंजाबने अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले.
एलिझाबेथने महिलांच्या वैयक्तिक विभागात ४४९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. हरयाणाची अंजुम मोदगील व गुजरातची लज्जा गोस्वामी यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. अंजुमने कनिष्ठ मुलींच्या गटात सुवर्णपदक जिंकले.